कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०८ : नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी आणि पिण्यासाठी ८ फेब्रुवारी रोजी आवर्तन सोडण्यात येणार आहे. साधारणतः २० दिवस म्हणजे २८ फेब्रुवारीपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार असून, या कालावधीत १.७ टीएमसी म्हणजेच १७०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे, अशी माहिती कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील पाणी वापर संस्थांनी व लाभधारक शेतकऱ्यांनी या आवर्तनाचे पाणी घेण्यासाठी तातडीने नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाच्या संबंधित शाखा कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आव्हानही कोल्हे यांनी केले आहे.
नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्याच्या पाण्याचा लाभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ४९ व गंगापूर तालुक्यातील ४६ गावांना तसेच नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील करंजी, धोत्रे, भोजडे, बोलकी, गोधेगाव आदी गावांना होतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नांदूर मधमेश्वर कालव्यातून सन २०२३-२४ च्या रब्बी हंगामासाठी व पिण्यासाठी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. कोपरगाव तालुक्यात गतवर्षी अत्यंत कमी पाऊस झालेला असून, तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. आतापासूनच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे.
याशिवाय दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे विहिरींच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. सध्या लोकांना पिण्यासाठी व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी स्नेहलता कोल्हे यांनी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाकडे केली होती. स्नेहलता कोल्हे यांच्या मागणीवरून रब्बी हंगामासाठी व पिण्यासाठी वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यातील नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यावरील वितरिका क्र. १ ते २६ व शाखा कालवा क्र.१ व २ वरील सर्व वितरिकांद्वारे येत्या ८ फेब्रुवारी रोजी दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनाचा फायदा रब्बी हंगामाच्या सिंचनासह पिण्यासाठी होणार आहे.
नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाने याबाबत नुकतेच जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले असून, नांदूर मधमेश्वर कालव्यातून सिंचनासाठी पाणी घेऊ इच्छिणाऱ्या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्था तसेच लाभधारक शेतकऱ्यांकडून पाणी मागणी अर्ज मागविले आहेत. त्यानुसार नांदूर मधमेश्वर कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांनी नमुना नंबर ७, ७ अ, ७ ब तसेच पाणी वापर संस्थांनी आपले पाणी मागणी अर्ज तात्काळ नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाच्या संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.
सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाने ‘हेड टू टेल’ पर्यंत सर्व लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी काटेकोरपणे आवर्तनाचे नियोजन करावे. तसेच संबंधित गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे तलाव, गावतळे या आवर्तनातून पाण्याने भरून द्यावेत, अशा सूचना कोल्हे यांनी नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.