माता रमाई जयंतीच्या मिरवणुकीत विवेक कोल्हे यांचा आनंदोत्सव,स्नेहलता कोल्हे यांनी महिलांसोबत खेळली फुगडी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यात मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती बुधवारी (७ फेब्रुवारी) कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सहभागी होऊन महिलांसोबत फुगडी खेळली, नृत्य केले, तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनीही भीमगीतांच्या तालावर शानदार नृत्य करून समाजबांधवांचा उत्साह वाढवला.

प्रारंभी स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. तसेच माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्व दलित, बौद्ध समाजबांधव, माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यागमूर्ती माता रमाई यांचे खूप मोठे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील आदर्श असे संविधान आपल्या भारत देशाला दिले.

देशात समतेवर आधारित समाजरचना असावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, मानवता धर्म जोपासावा, अशी शिकवण समाजाला दिली. त्यांनी दीन-दलित, शोषित, उपेक्षित व वंचित लोकांचे दु:ख दूर करून त्यांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. बाबासाहेबांप्रमाणे माता रमाई यांनीदेखील आपले संपूर्ण जीवन दीन-दलित व उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले. माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जवळजवळ तीस वर्षे हिमालयासारखी भक्कम साथ दिली.

त्यामुळे ते देशासाठी खूप मोठे कार्य करू शकले. त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे माता रमाई होय. माता रमाई यांना जीवनात अनेक आघात सहन करावे लागले. त्या आयुष्यभर दुःखाशी, गरिबीशी जिद्दीने झगडल्या; पण त्यांनी हार न मानता धैर्याने सर्व संकटांना तोंड दिले. माता रमाई आम्हा महिलांसाठी आदर्श असून, त्यांचे जीवनकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. महिलांनी माता रमाई यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जीवनात वाटचाल करावी. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मी नतमस्तक होऊन त्यांना कोटी कोटी नमन करते. 

त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांचा जयघोष करीत डीजेच्या दणदणाटात, ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत जल्लोषात निघालेल्या या मिरवणुकीत अशोक स्तंभासह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांचे सुंदर पुतळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

मिरवणुकीत दलित बांधव, महिला व तरुण कार्यकर्ते तल्लीन होऊन नाचत होते. यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी महिलांसोबत फुगडी खेळत नृत्य केले. विवेक कोल्हे यांनी ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र…’ व इतर भीमगीतांच्या तालावर भीमसैनिक व कार्यकर्त्यांसमवेत सुंदर नृत्य करून मिरवणुकीत रंगत आणली.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरपालिकेतील माजी गटनेते रवींद्र पाठक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते जितेंद्र रणशूर, विजय त्रिभुवन, दिनेश कांबळे, माजी नगरसेविका हर्षादा कांबळे, उज्ज्वला रणशूर, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात, राहुल खंडिझोड, नितीन बनसोडे, ऋषीकेश पवार, गौतम बनसोडे, नितीन शिंदे, राजेंद्र उशिरे, शंकर घोडेराव, रामदास कोपरे, संजय दुशिंग, मनोज शिंदे, शुभम शिंदे, राहुल रणशूर, अजय उशिरे, रवींद्र भालेराव, योगेश शिंदे, अतुल गुंजाळ, निलेश वाघ, आकाश डोखे, रोशन शेजवळ,

विजय भातनकर, अरविंद विघे, अशोक शिंदे, रवी शिंदे, अक्षय शिंदे, अरूण त्रिभुवन, साहेबराव कोपरे, संतोष शिंदे, दतुमामा पगारे, मुकेश धुळे, गणेश सोनवणे, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, रवींद्र रोहमारे, सतीश रानोडे, प्रसाद आढाव, विजय चव्हाणके, खलिक कुरेशी, फकिर मोहम्मद पैलवान, इलियास खाटिक, शफिक सय्यद, स्वप्नील मंजुळ यांच्यासह दलित, बौद्ध समाजबांधव, महिला भगिनी, आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आंबेडकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.