शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ : जीवन जगत असताना ज्ञानसंपादन करून कितीही मोठे व्हा, समाजात नावलौकिक मिळवा. कला कौशल्याच्या व संत विचाराच्या माध्यमातून धनप्राप्ती करा. मात्र, आई-वडिलांच्या आशीर्वादाला कधीही पारखे होऊ नका. परमेश्वर समजून त्यांची सेवा करा जीवनात काहीही कमी पडणार नाही. असे प्रतिपादन काशी केदारेश्वर देवस्थान नागलवाडीचे महंत बाबागिरी महाराज यांनी केले.
भायगाव येथील श्री नवनाथ बाबा देवस्थान मंदिरासमोरील प्रांगणात आयोजित श्री क्षेत्र देवगड संस्थांचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेल्या श्री नवनाथ ग्रंथ पारायण सांगता प्रसंगी धर्मनाथ बीज उत्सव आयोजित केला जातो. यावेळी आयोजित कीर्तन सेवेत महाराज बोलत होते.
महाराज पुढे म्हणाले, धर्मनाथ बीज उत्सव हा गुरुपरंपरेचा उत्सव आहे. जीवनात गुरूंना मोलाचे स्थान आहे. आई-वडील हे जीवनातील पहिले गुरू असल्याने त्यांची सेवाही धर्मकार्यच समजून करा. धर्मकार्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणाऱ्या देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या नरेंद्र मोदींचे कार्य ही धर्मकार्यच आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याचा साधु संतांना अभिमान वाटतो.
यावेळी विष्णु महाराज दुकळे, हरिभाऊ महाराज अकोलकर, भाऊसाहेब महाराज फटांगरे, अविनाश महाराज लोखंडे, भाऊसाहेब महाराज शेकडे, महेश महाराज शेळके, श्रीकृष्ण महाराज पैठणकर, भायगावचे सरपंच युवा नेते राजेंद्र आढाव, संदीप खरड, भगवान आढाव, शेषेराव दुकळे, दगडू दुकळे, डॉ. विजय खेडकर, मुरलीधर दुकळे, घनश्याम पालवे, नानासाहेब दुकळे, हरिचंद्र आढाव, बापूराव दुकळे, संजय लांडे, काकासाहेब विखे, रंगनाथ आढाव, शिवाजी लांडे, शहाराम आगळे यांच्यासह भायगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.