कोटा एक्सलन्स सेंटरच्या विद्यार्थिनींची तेलंगणा, हैदराबाद भेटीसाठी निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ :  समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियान सन २०२३-२४ या उपक्रमा अंतर्गत अभ्यासक्रम भेटीचे आयोजन करण्यात आले असून, त्यात उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ मधील जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या कोटा एक्सलन्स सेंटर मध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थिनींची तेलंगणा (हैद्राबाद) भेटीसाठी निवड झाली आहे.

ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर राज्यात भेटी देण्यास पाठविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण, सांस्कृतिक वृद्धीकरण व आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होते.

या सेंटर मधील गौरी सुधीर कंठाळी व अमृता रामेश्वर पावसे या विद्यार्थिनींची या उपक्रमासाठी निवड झाली म्हणून आबासाहेब काकडे विद्यालयाचे प्राचार्य संपत दसपुते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.     

काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड. डॉ. शिवाजी काकडे, माजी. जि.प. सदस्या हर्षदा काकडे, प्रा. लक्ष्मण बिटाळ, वंदना पुजारी, कोटा एक्सलन्स सेंटरचे विभाग प्रमुख हरीश खरड, कोटा एक्सलन्स सेंटरचे डायरेक्टर राजेश दारकुंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.