समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ श्रीरामपूर येथील मोटार वाहन निरीक्षक प्रशांत कंकरेज व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धनंजय गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये साजरा करण्यात आला.

मार्गदर्शन करताना मोटार वाहन निरीक्षक प्रशांत कंकरेज म्हणाले की, शाळेचे कोणतेही वाहन चालवत असताना वाहका जवळ स्वतःचे ओळखपत्र, लायसन्स, गाडी चालवत असलेल्या गाडीची कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या भागात गाडी चालवायची असेल, त्या भागाची माहिती, वाहतुकीच्या नियमांबरोबरच गाडी चालवणारा वाहक हा व्यसनमुक्त असला, तरच तो परिपूर्ण वाहक बनेल.

या रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त समता इंटरनॅशनल स्कूलच्या वाहतूक विभागातील ५२ वाहन चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच वाहन चालकांसोबतच चालकांना मदत करणारे मदतनीस व वाहनांचीही तपासणी करण्यात आली. या शिबिराला सुवर्णा ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष संतोष आहेर यांचे ही सहकार्य लाभले.

समता इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने मोटार वाहन निरीक्षक प्रशांत कंकरेज यांचा वाहतूक विभाग प्रमुख विजय घाडगे तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धनंजय गावित यांचा सत्कार आस्वाद भोजन विभागाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे, प्राचार्या हर्षालता शर्मा उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाहतूक विभागाचे कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.