एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.रमेश सानप यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी इमारतीच्या छतावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी केली. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व महाराष्ट्र गीत गायनानंतर अभिजीत बाविस्कर,ऋतुजा मोहिते या विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर केले. तर नीलम मगर या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांचे कार्य व गुण याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांनी भूषविले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तित्व व कार्य याविषयी काही प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना उद्बोधित केले आणि शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या प्रा.डॉ.उज्ज्वला भोर, प्रा.संजय शिंदे कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

भगवे झेंडे हातात घेतलेले मावळ्यांच्या पोषाखातील विद्यार्थी व मराठमोळा साज लेऊन नऊवारी साड्यांमध्ये सजलेल्या विद्यार्थिनी यांनी फुलून गेलेल्या परिसराला प्रसन्नतेचे व उत्सवाचे स्वरूप आलेले होते.