नगरपरिषदेकडून थकबाकीसाठी वसूली, पेट्रोल पंप व मंगल कार्यालय सील

शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ :  शेवगाव नगरपरिषदेने थकबाकी वसूली साठी बुधवारी कडक पाऊले उचलत एक पेट्रोल पंप व मंगल कार्यालय सील केले आहे. लोकसभा निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत. निवडणुक आचार संहितेचा भाग म्हणून अधिकारी वर्गाच्या जिल्हया बाहेर बदल्या होतात. याच कारणास्तव शेवगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन राऊत यांची मालेगावला सहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

राऊत येथे कार्यरत असतांना अतिशय मितभाषी होते. म्हणूनच त्यांचेवर मेनघुणे म्हणून त्यांची अनेकदा संभावना होत असे. त्यांच्या या मितभाषी व भिडस्त स्वभावामुळेच नगरपरिषदेच्या वसूलीला फटका बसला. नगरपरिषदेच्या तिजोरीत कायम खडखडाट असल्याने विकास कामे ठप्प असायची एवढेच काय पण नगरपरिषदेच्या नोकरदाराचे पगारही कायम प्रलंबित राहिले आहेत.

मात्र, याच राऊत यांनी आपला कार्यभार हस्तांतरित करण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी (दि.२१) थकबाकी वसूलीसाठी सील ठोकण्याची कारवाई करण्याचे आदेश पारित करून थकबाकीदारांना ‘जोरका धक्का धिरेसे लगे’ चा अनुभव देऊन त्यांची त्रेधा उडवून दिली आणि नगरपरिषदेची तिजोरी वजनदार करण्याला चालना दिली.

शेवगाव नगरपरिषदेची विविध व्यावसायिक व खातेदाराकडे करापोटी दहा अकरा कोटीवर थकबाकी आहे. ही वसूली वेळच्यावेळी होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक कामे रेंगाळली आहेत. तसेच पगारही वेळच्या वेळी होऊ शकत नाहीत. अशा अवस्थेत राऊत यांनी जाता जाता नगरपरिषद अधिनियम १९६५ चे कलम १५२ नुसार नोटीस देऊन येथील पैठण रस्त्यावरील अनुराग पेट्रोल पंप व नेवासे रस्त्यावरील शिवम गार्डन मंगल कार्यालय सील करण्याची धडक कारवाई करून अन्य थकबाकी दारांनी आपली थकबाकी भरून नगरपरिषदेला सहकार्य करावे आपलेवरील संभाव्य कारवाई टाळावी असे आवाहन केले.

पेट्रोल पंपाकडे एक लाख ३७ हजार ४१८ रुपये तर मंगलकार्यालयाकडे ८ लाख ४६ हजार ३३३ रुपये थकबाकी आहे. नगरपरिषदचे कार्यलयीन अधीक्षक  भाऊसाहेब जोगस, करनिरीक्षक शिरसाठ, अशोक सुपारे, अनिल लांडे, राजू साळवे, बाळू ढाकणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.