छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समजून घेणे गरजेचे – प्रा. प्रतिभाताई गायकवाड

महाराजांची वेशभूषा परिधान करून त्यांचे विचार आत्मसात होणार नाही

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. २५ : छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त अफजलखानाचा कोथळाच बाहेर नाही काढला, त्यांनी फक्त शाहिस्तेखानाची बोटच नाही छाटली त्यापलीकडे जावून सर्वांगीण छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे अद्वितीय कार्य समजून घेणे गरजेचे असल्याचे शिवव्याख्यात्या प्रा. प्रतिभाताई गायकवाड यांनी कोपरगाव येथे केले.

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे राजमाता जिजाऊ रत्न पुरस्कार प्राप्त प्रा. प्रतिभाताई गायकवाड यांच्या सुश्राव्य वाणीतून  ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजचा तरुण’ ह्या विषयावरील व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

बोलतांना पुढे प्रा. प्रतिभाताई गायकवाड म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रताप, त्यांची युद्धनिती, त्यांच्या शौर्याच्या गाथा यापलीकडे त्यांचे अद्वितीय कार्य, प्रजेपती व शेतकऱ्यांप्रती असलेली आत्मीयता देखील समजून घेणे गरजेचे आहे. आजच्या तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून त्यांचे विचार आत्मसात होणार नाही.

त्यापेक्षा त्यांच्या विचारांवर वाटचाल केल्यास महाराज आपल्याला समजले हे सिद्ध होवू शकते. आपल्या देशाकडे युवकांचा देश म्हणून पाहिले जाते. देशाच्या उज्वल भविष्यासाठी देशाला युवकांची गरज आहे त्यासाठी युवकांनी व्यसनापासून दूर रहावे व व्यसनामुळे आयुष्य बरबाद करू नका असा मौलिक सल्ला दिला.

आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. सौ.पुष्पाताई काळे यांचे महिलांप्रती मोठे काम असून त्या आपलं आयुष्य महिला सक्षमीकरणासाठी व महिलांच्या उत्कर्षासाठी व्यतीत करीत आहे, याचा एक महिला म्हणून मला अभिमान वाटतो. काळे परिवार नेहमीच महिलांच्या पाठीशी उभा असल्यामुळे कोपरगावातील महिलांनी देखील सर्वच क्षेत्रात आघाडी घ्यावी असे आवाहन केले.

याप्रसंगी गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे,प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या, जिजाऊ महिला मंडळाच्या सदस्या, महिला भगिनी व तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.