निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूकीची तयारी सुरु

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणुक यंञणा तालुका निहाय सज्ज करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बैठक घेवून शासकीय यंञणा सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. 

कोपरगाव तहसील कार्यालय येथील तहसीलदार यांच्या दालनात सोमवारी दुपारी  शिर्डी ३८ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत २१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक पूर्वतयारी कामकाजाची आढावा बैठक सहायक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीररसागर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

सदर बैठकीस निवडणूक नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी तसेच क्षेत्रीय अधिकारी किशोर शिंदे, संतोष दळवी, एन. जी. रोडे, सचिन कोष्टी, शेखर मिटकरी आदी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी बालाजी क्षिरसागर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आढावा घेताना मतदान केंद्र व त्यावरील मूलभूत सुविधा, मतदान प्रक्रियेच्या वेळी व निवडणुकीच्या दरम्यान कर्मचारी यांनी कसा एकमेकांशी संपर्क साधावा यांचा आराखडा, मतदान प्रक्रियेतील साहित्य स्वीकारणे साहित्य वितरित करणे, नवीन आयटी अप्लिकेशन जसे की, सी विजिल, एन्कोर, सुविधा ईएसएमएस इत्यादी ॲप, आदर्श आचारसंहिता अमलबजावणीसाठी विविध पथक जसे की FST, SST, VVT व इतर कामकाजाबद्दल मार्गदर्शन करीत योग्य त्या सुचना देवून चर्चा करण्यात आली.

आदर्श मतदान केंद्र निर्मिती, बूथ लेवल, व्हिलेज लेवल अवेअरनेस ग्रुप तयार करणे इत्यादी. मतदान वाढण्याच्या दृष्टीने कामकाज करण्याच्या सूचना  देण्यात दिल्या. लोकसभेची निवडणूक प्रक्रिया येत्या काही दिवसात कधी पण घोषित होऊ शकते. तेव्हा निवडणूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपली सर्व यंञणा सक्षमपणे तयारीत ठेवणे तसेच त्या दृष्टीने सर्व निवडणूक कामकाज अधिकारी कर्मचारी यांना सज्ज राहण्याची निर्देश दिले.

शेवटी निवडणूक कामकाज, आदेश, दिलेले कर्मचारी, अधिकारी कामकाजावर रूजू होण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम ११३४ नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

 लोकसभा निवडणूक कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल तेव्हा सर्व अधिकारी कामात अद्यावत राहावे. कामात दुर्लक्ष, कुचराई सहन केली जाणार नाही. असे देखील यावेळी सांगितले. त्यामुळे सन २०२४ ची लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली आहे.‌