स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ व मोफत साड्या वाटप

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महायुती सरकारने रेशनकार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ व त्यासोबत वस्त्रोद्योग विभागामार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी (२६ फेब्रुवारी) कोपरगाव येथील येवला रोडवरील उल्हास पवार यांच्या स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ व मोफत साड्यांचे वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणावर भर देत महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या असून, सर्वसामान्य शेतकरी, महिला, युवक व गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.

शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ व मोफत साडी देण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे, असे प्रतिपादन स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास स्वस्त धान्य दुकानदार उल्हास पवार, उत्तमराव चरमळ. शोभाताई पवार, अंबादास पाटोळे, गणपत गव्हाणे, जगदीश मोरे, महेश गोसावी यांच्यासह शिधापत्रिकाधारक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारताला एक कार्यक्षम, कर्तृत्ववान, विकासाची दूरदृष्टी असलेले दृष्टे नेतृत्व लाभले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या साडेनऊ वर्षांत जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीचा विचार करून विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाला मोठा आधार दिला आहे.

कोरोना महामारीच्या काळात मोदी यांनी देशवासियांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत ८० कोटी नागरिकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेऊन गोरगरिबांना मोठा आधार दिला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाखो बेघरांना घरकुल उपलब्ध करून दिले. चुलीवर स्वयंपाक करताना धुरापासून होणाऱ्या त्रासापासून महिलांची मुक्तता करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू करून अवघ्या शंभर रुपयांत गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे.

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ हा मंत्र जपत ते समर्पित वृत्तीने देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र काम करत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला सरकारच्या योजनेचा लाभ मिळत असून, ‘मोदी की गॅरंटी म्हणजे पूर्ततेची हमी’ यावर जनतेचा ठाम विश्वास बसला आहे.

केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच राज्यातील महायुती सरकारने जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन अनेक विकास योजना सुरू केल्या असून, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आदी विविध सण तसेच शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्वस्त धान्य दुकानातून १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी अशा राज्यातील एकूण १ कोटी ६८ लाख ५० हजार ७३५ शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ म्हणून १०० रुपये या सवलतीच्या दराने १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणा डाळ, रवा, मैदा व पोहा असे सहा पदार्थ दिले जात आहेत.

सोबतच महिलांचा सन्मान म्हणून राज्य वस्त्रोद्योग विभागातर्फे अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलेला दरवर्षी मोफत साडी दिली जात आहे. २२ जानेवारीपासून सुरू झालेली ही योजना २९ फेब्रुवारीपर्यंत राबविली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने ५ हजार ६४९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कोपरगाव मतदारसंघातील सर्व रेशनकार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. सरकारने ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा निर्णय घेतल्यामुळे गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण झाला असल्याचे सांगून केंद्र व राज्य सरकारने गोरगरिबांसाठी अनेक लोकहितकारी योजना सुरू केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.