९ लाख ६० हजार रु.किंमतीचा मुद्दे माल जप्त आरोपीवर गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : शेवगावातील एका कापसाच्या जिनिंग प्रेसिंग मिलमधून कापूस चोरून नेतांना रात्रीच्या गस्तीवर असलेल्या शेवगाव पोलिस पथकाने १० क्विंटल कापसासह एक विना क्रमांकाचा पिक अप असा एकूण ९ लाख ६० हजार रु. किंमतीचा मुद्दे माल जप्त करून चौघा आरोपीना चतुर्भूज केले आहे. ही घटना काल मंगळवारी मध्यरात्री घडली असून यावेळी अन्य दोघे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. शेवगाव पोलिसात दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         

या संदर्भात येथील पैठण रस्त्यावरील अन्नपूर्णा जिनिगचे व्यवस्थापक मजिब मेहबूब शेख यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, पोलिस पथकातील होमगार्ड मतीन आश्रब बेग याने मंगळवारी मध्य रात्री फोन करून मला उठवले तेव्हा बाहेर आलो असतां चार जण कापूस गोण्यात भरतांना दिसले. त्यांना अडवण्यासाठी गेलो असता चोरट्यांनी हातातील चाकूचा व टॉमीचा धाक धाकवून, ‘गप्प बस नाहीतर तुला जीवे ठार मारून टाकू’ असा दम देवून एकाने लोखंडी टॉमी आपल्या दिशेने फेकली. मात्र, आपण ती हुकवली.

यावेळी झालेल्या आरडा ओरडीने काही कामगार उठल्याचे पाहून चोरटे पळून जात असतांना गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने चोरट्याचा पाठला करून भानुदास बाबूराव गायकवाड, राजू दत्ता बर्डे दोन्ही राहणार देऊळगाव राजा जि. बुलढाणा, हल्ली रा. भारस्कर वस्ती शेवगाव, विवेक योगराज पाटील रा. लासगाव ता. पाचोरा जि. जळगाव हल्ली रा. भारस्कर वस्ती शेवगाव, किरण कचरू मोहिते रा. मगर वस्ती यांना पकडले. तर अंधाराचा फायदा घेत संदिप वाघमारे रा. शेवगाव व बळीराम फुगे रा. जालना हे दोघे पळून गेले.

यावेळी जिनिंग जवळच पांढऱ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या पीकअप मध्ये १० क्विंटल कापसाच्या गोण्या व भोत मिळून आले. पोलिसांनी पिकअप सह १० किंटल कापूस असा एकूण ९ लाख ६० हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मील व्यवस्थापक शेख यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी दरोडयाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील अधिक तपास करत आहेत.

उप विभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, पोनि दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनि. अमोल पवार, हेकॉ सुधाकर दराडे, संजय बडे, किशोर काळे, संतोष वाघ, शाम गुंजाळ, अमोल ढाळे, संपत खेडकर, एकनाथ गर्कळ, कृष्णा मोरे, होमगार्ड मतीन बेग, महेश घाडगे, रवि बोधले, पांडूरंग दहिफळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.