शेवगावात पालिकेच्या कारवाईने अतिक्रमणधारक कोमात

शेवगाव प्रतिनिधी, दि.१३  : गेल्या काही दिवसात शेवगाव शहरात ठीक ठिकाणी मोक्याच्या जागी सुरू असलेल्या  अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काहीचा अतिक्रमण करून स्थिरस्थावर झाल्यानंतर काही दिवसातच या जागा वा टपऱ्या विकून पैसे कमावण्याचा गोरख धंदा येथे जोमात सुरू आहे.

       येथील अनेक रहदारीचे रस्ते अतिक्रमांच्या विळख्यात अडकले आहेत. येथील मोची गल्लीतील जिल्हा परिषदेच्या  प्राथमिक शाळेच्या मागील बाजूची संरक्षक भिंत गेल्या पावसाळ्यात पडली. त्यावेळी मोकळ्या झालेल्या जागेचा फायदा अशाच टपरीधारकांनी उठवला. याबाबत परिसरातील काहींनी नगर परिषदेकडे व जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापनाचे लक्ष वेधले. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

      त्यानंतर परवा शनिवारी भिंतीच्या बाहेरच्या बाजूने भररस्त्त्यात काही टपरीधारकांनी रात्रीतून अतिक्रमण केले.  काहींनी बारदाना बांधून, काहींनी टपऱ्या टाकून तर कांहींनी बल्या रोवून जूने लाकडी टेबल खुर्च्या टाकून जागा आरक्षित केली.
          यावेळी परिसरातील समोरील बाजूस असलेल्या स्वमालकीच्या जागेत लाखो रुपये गुंतवणूक करून वंशपरंपरागत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी व काही दक्ष नागरिकांनी ही बाब नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन निदर्शनास आणून दिली. यावेळी या व्यवसायिकांनी एक तर अनधिकृत होणारे हे अतिक्रमण तातडीने हटवा अन्यथा आम्हालाही हवे तेथे अतिक्रमण करण्याची परवानगी द्या अशी  ठाम भूमिका मांडली.

यावर नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मागणीची दखल घेत सोमवारी नगर परिषदेचे स्थापत्य अभियंता प्रशांत सोनटक्के, अतिक्रमण विरोधी पथकाचे भानुदास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात   या गल्लीतील रात्रीतून झालेले सर्व अतिक्रमणाचे साहित्य हटवून जप्त केले.  नगरपरिषद प्रशासनाच्या या कारवाईचे कौतुक होत असून  प्रशासनाने  अन्यत्र  ठिकठिकाणी सुरू असलेल्या अशाच स्वरूपाच्या अनाधिकृत अतिक्रमण व बांधकाम धारकावर देखील  कारवाई करावी आणि घुसमटलेल्या रस्त्याचा श्वास मोकळा करावा. अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.