शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : तालुक्यातील ताजनापूर उपसा जलसिचन टप्पा क्र.२ योजनेमधून चापडगाव, प्रभूवाडगाव, सोनेसांगवी सह परिसरातील १७ गावातील बंधारे, पाझरतलाव भरून द्यावेत अशा आशयाचे निवेदन जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांनी अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाच्या उपकार्यकारी अभियंता एस.एम.शेख यांना अहमदनगर येथे दिले.
जायकवाडी धरणामध्ये शेवगाव तालुक्यातील २९ गावे गेली. त्याची नुकसान भरपाई म्हणून जायकवाडी धरणामध्ये ३.८ टी.एम.सी. पाणी शेवगाव तालुक्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. हेच पाणी शेवगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला मिळावे यासाठी सन २००० पासून ताजनापूर कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.शिवाजी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीचे सदस्य प्रयत्न करत आहेत.
ताजनापूर टप्पा क्र.०२ ची एकदा चाचणी होऊन आता दुसऱ्यांदा सदर योजनेची चाचणी काही दिवसात होत आहे. सदरची चाचणी करतांना पुन्हा एकाच विद्युतपंपाची चाचणी होणार असल्याचे समजते. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून तालुक्याच्या पूर्व दुष्काळी भागातील विहिरी, कुपन नलिकांचे पाणी कमी होत आहे. तर काही कोरड्या पडलेल्या आहेत.
त्यामुळे पिके थोड्या पाण्यावाचून जळून जाण्याच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत जर येथील बंधारे, पाझर तलाव ताजनापूर टप्पा क्र.२ मधून भरून मिळाले तर या भागातील विहिरींना पाणी वाढेल. पर्यायाने शेतकऱ्यांनी खर्च करून दिवसरात्र एककरून पिकवलेली पिके वाचतील. तरी सदरच्या योजनेची चाचणी करतांना एका विद्युतपंपाची चाचणी न करता दोन विद्युतपंपाची चाचणी करून चापडगाव, प्रभूवाडगाव, सोनेसांगवी परिसरातील बंधारे व पाझर तलाव भरून मिळावेत.
जेणेकरून या भागातील शेतीच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल असेही निवेदनात म्हंटले आहे. निवेदन देते वेळी शेवगाव उपविभागाचे कार्यकारी अभियंता श्रीहरी कुलकर्णी, अभियंता श्रीधर म्हस्के, सुनील आव्हाड, तुकाराम विघ्ने उपस्थित होते.