शेवगाव प्रतिनिधी, दि.२ : बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणाऱ्यां दोघाच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात येथील एका सीए मुळे हा बनावट प्रमाणपत्राचा प्रकार उघडकीस आला असून, आणखी अशी किती बनावट प्रमाणपत्रे दिली याचा शेवगाव पो नि दिगंबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि निरज बोकील शोध घेत आहेत.
पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेऊन नोटीस बजावून सोडून दिले. याबाबत डॉ. अमोल तुळशीराम काळे यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले की, मी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून माझ्या अधिपत्याखाली विवाह नोंदणी कक्षाचे काम चालते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे व लिपिक सदाशिव कराळे असे आम्ही तिघे असताना विवाह नोंदणीचे काम पाहणाऱ्या महानंदा जाधव यांनी येऊन माहिती दिली की, २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी इन्कम टॅक्सचे कामानिमित्ताने येथील सीए बालवीर मोहनसिंग परदेशी यांच्या कडे गेले होते.
यावेळी झालेल्या चर्चेत त्यांना विवाह नोंदणी विभगात कार्यरत असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी शहरातील क्रांती चौकातील संकेत झेरॉक्स या दुकानातून घेतलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र दाखवले. ते प्रमाणपत्र बनावट होते. म्हणून वरिष्ठांच्या आदेशाने महानंदा जाधव यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात या प्रमाणपत्र बाबत तक्रारर अर्ज दिला आहे.
त्यानुसार पोलिसानी संकेत झेरॉक्सचे मालक संदीप कचरु राऊत, रा. भगतसिंग चौक, तसेच चैतन्य झेरॉक्सचे मालक चैतन्य संतोष उन्मेघ रा. भडके मळा हे बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र देत असल्याची खात्री करून दोघे विवाह नोंदणीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून ते खरे प्रमाणपत्र आहे असे भासवून शासनाची फसवणुक केली आहे. म्हणून त्यांचे विरुध्द भा.द.वी. कलम ४२०,४६५,४६८ प्रमाणे कायदेशीर तक्रार देत असल्याचे म्हटले आहे.