सैनिक हा समाजाचा अमूल्य ठेवा – डॉ. गिरीष कुलकर्णी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : आजी माजी सैनिक हा समाजाचा अमूल्य ठेवा आहे. देश सेवेसाठी सर्वस्वाचा त्याग करणारा सैनिक जरी सेवानिवृत्त झाला तरी समाजाने त्यांचे शौर्य आणि त्याग विसरता कामा नये. आज विविध क्षेत्रात नितीमत्तेची पडझड झालेला हा काळ असल्याने निवृत्त सैनिकांच्या भूमिकेला विशेष महत्व आहे.  तरुण पिढीला दिशा देण्यासाठी तसेच देशाचे भवितव्य व नागरी हक्काचे जतन करण्यासाठी सेवानिवृत सैनिकांनी त्यांचे  परिसरात लोक जागृती व प्रबोधनासाठी जागल्याचे काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन नगरच्या स्नेहालय संस्थेचे प्रवर्तक डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी येथे केले.

शेवगाव पाथर्डी तालुका माजी सैनिक सेवा सघ, वनमित्र सघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे माध्यमिक विद्यालयाच्या बाभळवनात दोन्ही तालुक्यातील आजी माजी सैनिक, शहीद जवानांच्या वीरमाता, वरिपत्नी व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा नागरी गुणगौरव सोहळा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुलकर्णी यांचे अध्यक्षते खाली रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, आजच्या युवापिढी मध्ये सर्व नागरिकांत सदभावना निर्माण व्हावी त्यांच्यात देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी. यासाठी माजी सैनिकांनी त्यांना मार्गदर्शन करावे. तरुण पिढीला दिशा देण्यासाठी काम करावे. समाजाने सुद्धा माजी सैनिकांना सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.

शासकीयअधिकाऱ्यांनी आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सहानुभूतीने सोडवून त्यांचा सन्मान राखावा असे सांगून येथे खरे प्रश्न सामाजिक असून कायद्याने ते सोडता येत नाहीत. बालविवाह, प्लॅस्टिक वापर, स्त्रीभृण हत्या, व्यसनाधिनता असे अनेक समाजविघातक प्रश्न सोडविण्यासाठी आपण आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

ॲड. प्रतापराव ढाकणे म्हणाले, भारतीय लष्कराला गौरव शाली परंपरा असून शेवगाव-पाथर्डी परिसरातील अनेकांनी देशसेवेसाठी आपले बलीदान दिले आहे. अनेकांच्या शौर्यकथा आज कित्येक वर्षानंतर सुद्धा आपणास प्रेरणा दायी ठरत आहेत. सैनिक हे कणखर व शिस्तप्रीय असतात. समाजात सैनिकाला सतत मानसन्मान द्यायला हवा. युवा पिढीला त्यांच्या कार्यापासून स्फुर्ती व प्रेरणा मिळावी. यासाठी या नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रारंभी वीर माता व वीर पत्नी गिताताई फलके, कृष्णाबाई नागे, वंदना कोकाटे, मंगल लोंढे, मथुराबाई काटमोरे, कांचन साळवे ,पद्माबाई आधाट , पुनम काळे, यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर मेजर पांडूरग शिरसाठ, शिवाजी पालवे, बाबासाहेब आंधळे, डॉ सर्जेराव नांगरे, शिवाजीराव वेताळ, शिवाजी बडे, परशुराम पाचपुते, योसेफ कळकुंबे, शंकरराव पालवे, सुरेश आव्हाड, रावसाहेब काळे, अनिल म्हस्के, विनोद शेळके आदिसह अनेक आजी माजी सैनिकाचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भारदे शिक्षण संस्थेचे सचिव हरिष भारदे, माधव काटे, शिवशंकर राजळे, अप्पर तहसीलदार राहूल गुरव, नायब तहसीलदार रविंद्र सानप, डॉ. प्रकाश घनवट, एजाज काझी, राहूल मगरे, एकनाथ कुसळकर, प्रताप फडके, वजीर पठाण, राहूल मगरे, रिजवान शेख, नवनाथ ढाकणे, बाळासाहेब डाके, सुभाष लांडे, शरद सोनवणे आदिसह मान्यवर उपस्थित होते. वन मित्र संघटनेचे तथा केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी प्रास्तावित केले. गणेश सरोदे यांनी सूत्रसंचालन केले तर ॲड. संजय सानप यांनी आभार मानले.