आमदार काळेंच्या प्रयत्नातून कोपरगावच्या इतिहासाला मिळणार झळाळी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ :- कोपरगाव शहरातील राघोबादादांच्या वाड्याची दूरावस्था झाल्यामुळे कोपरगावच्या इतिहासाच्या पाऊलखुणा बुजतात की काय असा प्रश्न इतिहास प्रेमी व कोपरगावकरांना पडला होता. त्याची दखल घेवून आ. आशुतोष काळे राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने या वाड्याच्या संवर्धनासाठी ७ कोटी २७ लक्ष ७० हजार रुपये निधीस प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघाला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभला आहे. देवगुरू पुत्र कचेश्वर, दानवांचे गुरू व संजीवनी मंत्राचे निर्माते ऋषी शुक्राचार्य आणि देवयानी यांच्या समाधी गोदातटी असून ऐतिहासिक घटनांच्या साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू मतदार संघात आहेत. त्यापैकी कोपरगांव शहरातील जुनी मामलेदार कचेरी म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण अर्थात राघोबाबादादा पेशवे यांचा पुरातन वाडा. हा वाडा मोडकळीस येवून हा ऐतिहासिक ठेवा अखेरच्या घटका मोजीत होता.

त्याची आ. आशुतोष काळे यांनी गांभीर्याने दखल घेवून या वाड्याच्या संवर्धनासाठी निधी मिळविला आहे. धार्मिक पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक पर्यटनाला देखील तेवढेच महत्व आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूला उर्जितावस्था प्राप्त होवून ऐतिहासिक स्थळाच्या निर्मितीतून पर्यटनाला चालना मिळावी व त्या  माध्यमातून बाजारपेठेला आर्थिक उभारी मिळावी हा त्यांचा उद्देश आहे.

 आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असतांना देखील देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे क्षेत्र सातत्याने विस्तारते आहे. पुरातन स्थळे, मंदिरांचे ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, त्यांचे संवर्धन करून पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे गरजेचे आहे. ही स्थळे जागतिक पटलावर आल्यास पर्यटनवृद्धी होईल. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होत असते. आ. आशुतोष काळेंच्या दैदिप्यमान कामगिरीच्या बळावर विकासाच्या बाबतीत संपूर्ण कोपरगाव मतदार संघाने कात टाकली आहे.

विकसित मतदार संघ म्हणून कोपरगावची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कोपरगावच्या संस्कृतीच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेली ऐतिहासिक स्थळे कोपरगावकरांच्या स्मृतिपटलावरून नामशेष होणार नाही याची काळजी घेवून आ. आशुतोष काळे यांनी ऐतिहासीक राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी ७.२७ कोटी निधी आणल्यामुळे कोपरगावच्या इतिहासाला पुन्हा झळाळी मिळणार आहे.

कोणत्याही अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेत असतांना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासा बरोबरच पर्यटकांची कोपरगावच्या भूमिकेकडे पावले वळविण्यासाठी  ऐतिहासीक राघोबादादा वाड्याच्या संवर्धनाचा घेतलेला निर्णय कोपरगावच्या व्यवसाय वाढीच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यामुळे समस्त कोपरगावकर व इतिहासप्रेमींनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

यापुढील काळात मतदार संघातील इतरही ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. ऐतिहासीक राघोबादादा वाड्याच्या संवर्धनासाठी ७.२७ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे, पर्यटनमंत्री ना.गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.