शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान तातडीने जमा करा – दत्ता फंदे

शेवगाव प्रतिनिधी, दि.१४ :  तालुक्यामध्ये २०२३/२४ या वर्षात अत्यंत अल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. शेवगाव तालुक्यातील ११३ गावापैकी खरिपाच्या ३४ गावांमध्ये या आधीच ५०% च्या आत आणेवारी जाहीर झाली आहे.

तरीही अद्याप अनुदान वाटपाचा जीआर आलेला नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात आलेले नाही. दुष्काळातील, वीज बील वसुली थांबवणे, वीज बीलात ३३% टक्के सूट देणे, रोजगार हमीचे काम चालू करणे, जनावरांना चारा पुरविणे, टँकरने पिण्याचे पाणी देणे, कर्ज वसुली थांबवणे, कर्जाचे पुनर्गठन करणे या योजना अद्याप सुरू झाल्या नाहीत.  

पीक विमाही मंजूर करण्यात आलेला नाही. शासनाने शेवगाव तालुक्यातील सहा महसूल मंडळे चापडगाव, ढोरजळगाव, बोधेगाव, भातकुडगाव, एरंडगाव शेवगाव ही महसूल मंडळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून जाहीर केलेली आहेत. तरी याबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान जमा करावे.

राहिलेल्या रब्बीच्या ७९ गावांची आणेवारी १५ मार्च पर्यंत ५०% टक्क्याच्याआत करावी अशा मागण्याचे निवेदन  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, तसेच जिल्हा अधिकारी, तहसीलदार शेवगाव, यांच्याकडे केली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास २० मार्चपासून गावोगावी साखळी उपोषण करण्यात येईल असा हशारा देण्यात आला आहे.