गरिबी हा श्रीमंत होण्यासाठीचा सर्वात मोठा मार्ग – सुदाम शेळके

सोमैया महाविद्यालयात पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ :  “ज्याला आयुष्याच्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचा आहे, त्यानेच स्पर्धा-परीक्षेच्या वाट्याला जावं. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय कोणताही पर्याय नाही. गरिबी हा श्रीमंत होण्यासाठीचा सर्वात मोठा मार्ग आहे.” असे प्रतिपादन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व ज्ञानदा करिअर अकॅडमी सिन्नरचे संचालक सुदाम शेळके सर यांनी येथे केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी एस यादव होते.

शेळके पुढे म्हणाले की, महाविद्यालयात अभ्यास करताना आपल्या ध्येयाकडे नजर ठेवून सातत्यपूर्वक परिश्रम करणे म्हणजेच यशस्वी जीवनाची हमी होय. पोलीस भरतीसाठी तयारी करताना कशाप्रकारे अभ्यास करावा, मैदानी चाचणी परीक्षेला कसे सामोरे जावे, याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. बी एस यादव आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि तेथे उपलब्ध असलेल्या विविध ग्रंथांचा लाभ घ्यावा तसेच अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशस्वी होणे कठीण नाही. महाविद्यालयात अशाच प्रकारे इतरही अनेक उपक्रम राबविले जातात, त्याचाही विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.” याप्रसंगी व्यासपीठावर वाणिज्य विभागाचे डॉ. संजय अरगडे, डॉ.रवींद्र जाधव होते.

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध कौशल्य आत्मसात करावी व कोणत्याही कामाची लाज बाळगू नये. आपले जीवन यशस्वी करायचे असेल तर स्पर्धा-परीक्षे शिवाय पर्याय नाही. असे मनोगत डॉ. संजय अरगडे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना डॉ.वसुदेव साळुंके यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. तसेच स्पर्धा-परीक्षा मार्गदर्शन केंद्रा मार्फत राबविण्यात येत असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सदिया तांबोळीची महाराष्ट्र वन सेवेत वनरक्षक पदावर निवड तसेच कु.निलिमा नानकरची दुय्यम उपनिबंधक पदी निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.

याप्रसंगी उपस्थित असलेले माजी विद्यार्थी वैभव ढमाले यांची नर्सिंग असिस्टंट पदी नेमणूक झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा. नवनाथ डोखे व महेश दारोळे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष सोनवणे, प्रा.स्वागत रणधीर, प्रा.अजित धनवटे, प्रा.सुनिल गुंजाळ हे यांनी विशेष परिश्रम घेतले.