संजीवनी पॉलिटेक्निक मध्ये वार्षिक पारीतोषिक व गुणगौरव सोहळा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : कोणतेही यश प्राप्त झाल्याचे गर्व करू नका. स्वतःचा शोध घ्या. प्रत्येक व्यक्ती जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो, कारण तो रोज नवीन काही तरी शिकत असतो. खेड्यातील असल्याचा न्युनगंड बाळगु नका. हिम्मत, जिध्द, चिकाटी व आत्मविश्वासाने पुढे जा, असा सल्ला माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिला.

संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निक आयोजीत वार्षिक पारीतोषिक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात कोल्हे प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. प्राचार्य ए. आर. मिरीकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध विभागांचे विभाग प्रमुख, डीन्स, शिक्षक व शैक्षणिक वर्ष २०२३-२४  मध्ये विविध क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करून बक्षिसे मिळविणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संजीवनी पॉलिटेक्निकच्या राज्य व देश पातळीवरील विविध उपलब्धींबाबत माहिती दिली. सदर प्रसंगी विविध कंपन्यांमध्ये अंतिम निकाला अगोदरच नोकरी मिळालेले नवोदित अभियंते, विभागीय व राज्य पातळीवरील विविध क्रीडा प्रकारांमध्ये जिंकलेले खेळाडू, शोध निबंध, प्रकल्प स्पर्धा, इंतर तांत्रिक स्पर्धा, मागील वर्षी प्रत्येक वर्गातुन पहिले तीन गुणवत्ताधारक विद्यार्थी, अशा सुमारे २२५ गुणवंतांचा सत्कार कोल्हे यांचे हस्ते सन्मानचिन्ह देवुन करण्यात आला.

कोल्हे म्हणाल्या की इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्याना नामांकित कंपन्यांमध्ये संस्थेच्या प्रयत्नाने नोकऱ्या मिळत आहे, प्रत्येक क्षेत्रात मुलं मुली बक्षिसे मिळवित आहेत, असे सर्व विद्यार्थी हे भूषण असुन त्यांचे हे यश खऱ्या अर्थाने स्व. शंकरराव कोल्हे यांना आदरांजली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे सातत्याने प्रयत्न असतात.

विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्याच्या यशाबद्दल जेवढा आनंद होतो, तेवढाच आनंद आम्हाला होतो, कारण संजीवनी हा एक परीवार आहे. बक्षिसे मिळवण्यामध्ये मुलींचीही संख्या उल्लेखनीय होती. यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी खुप हाल सहन केले. बहुतांशी पालक मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवित नसायचे, परंतु स्व. कोल्हे यांनी संजीवनी अंतर्गत विविध शैक्षणिक दालने सुरू केल्यामुळे येथे मुलींच्या शिक्षणाची मोठी सोय होवुन मुलीही आत्मनिर्भर बनत आहेत.

विद्यार्थ्यांना सल्ला देताना त्या म्हणाल्या की आई वडील स्वतः काटकसर, आपल्या काही गरजांना मुरड घालत त्यांच्या पाल्यांसाठी काही कमी पडू नये याची काळजी घेतात, तसेच येथिल शिक्षक प्रत्येक मुलाची काळजी घेतात. या सर्वाबध्दल कृतज्ञतेची जाणिव मुलांनी ठेवावी, एकमेकांना मदत करा, जे पुढे गेले त्यांनी मागच्यांनाही बरोबर घ्यावे, आपण जगाच्या स्पर्धेत असुन एकमेकांशी जोडलेले रहा. प्रा. आय. के. सय्यद यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. जी. एन. जोर्वेकर यांनी आभार मानले.