जादा नफ्याचे अभिष दाखवून शेअर ट्रेडींग व्यावसायिकाने गुंतवणूकदारांना लावला कोटींचा चूना

शेवगाव प्रतिनिधी, दि.१५ :  जादा परतावा देण्याचे अभिष दाखवून मोठी रक्कम गोळा करून तालुक्यातील शेअर ट्रेडींग व्यावसायिकांनी धूम ठोकल्याच्या घटना रोजच घडत आहेत. गदेवाडी परिसरातील व्यावसायिकही पळून गेल्याने गुतवणूकदार हतबल झाले आहेत. जादा परतावा देण्याच्या लोभाने शेअर ट्रेडींग व्यावसायिकाकडे गुंतवणूक करणाऱ्यांना चूना लावून आठवडा भरात एकामागोमाग एक असे तीघे शेअर ट्रेडींग व्यावसायिक पळून गेल्याने गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे.

यातील एकाने गुंतवणूक दारांना आकर्षित करून त्यांचा विश्वास संपादन करण्याच्या उद्देशाने परतीचे धनादेश देखील दिले होते. मात्र त्याच्या कार्यालयाला कुलुप दिसल्याने गुंतवणूकदार धनादेश घेऊन बँकेत गेले असता त्याच्या खात्यात खडखडाट असल्याने त्यांची तोंड दाबून बुक्याचा मार अशी अवस्था झाली.

या उद्योगातुनच तालुक्यातील अंतरवाली येथील फरार झालेल्या शेअर ट्रेडिंग व्यावसायिक, छत्रपती विघ्ने याचे कार्यालय सोमवारी (दि.१५) सकाळी गुंतवणूकदारांनी फोडले व मिळेल ते साहित्य वाहनातून घेऊन गेले. अंतरवाली येथे गेल्या काही महिन्यापासून छत्रपती विघ्ने आणि त्याच्या सहकाऱ्याने शेअर मार्केटचे कार्यालय सुरू केले होते.

त्यात शेअर ट्रेडिंग मार्केटच्या नावाखाली लोकांकडून नऊ ते दहा कोटी रुपये जमा करून दोन दिवसांपूर्वी तो फरार झाला. परंतु त्याने व्हाट्सअप वर एका ग्रुप वर, ‘मी पळून गेलो नाही. मी तुमचे पैसे देणार आहे. फक्त मला थोडी मुदत द्या.’ असे भावनिक आवाहन गुंतवणूकदारांना केले. मात्र, फसवणूक झालेले गुंतवणूकदार दि. १५ मार्च २०२४ सोमवार रोजी सकाळी दहाला त्याच्या कार्यालयावर धडकले आणि कार्यालय फोडून त्यातील फर्निचर, कम्प्युटर, लॅपटॉप, फॅन, खुर्च्या आणि इतर साहित्य टेम्पो भरून घेऊन गेले आहेत.