८५ वर्षांवरील जेष्ठ आणि दिव्यांग मतदार घरून मतदान करण्याची सुविधा

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : देशातील ८५ वर्षांवरील जेष्ठ आणि दिव्यांग मतदार आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने यावेळी घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार शेवगाव पाथर्डी २२२ विधान सभा मतदार संघात एकूण ८५ नागरिकांनी घरून मतदान करण्याचे फॉर्म भरून दिले होते. त्यापैकी ८२ मतदाराचे घरून मतदान करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रात्नाधिकारी प्रसाद मते, तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.

 फार्म भरून दिलेल्या या ८५  मतदारांच्या घरी  निवडणूक विभागाने वेगवेगळी पथके नियुक्त केली होती. या पथकांनी या मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करून घेतले. या मोहिमेत ८५ पैकी ८२ मतदारांनी मतदान केले. मतदान न झालेल्या तीन ज्येष्ठा पैकी दोन मतदार मयत झाले आहेत. तर एका मतदाराच्या घरी पथकाने दोन वेळा जाऊन देखील संबंधित महिला मतदार भेटल्या नाहीत म्हणून ते मतदान होणे बाकी राहिले.  

  मतदान करणे प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य असून त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजावावा शासन स्तरावर मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोग व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार विधानसभा मतदारसंघातील ज्या मतदान केंद्रावर मागील निवडणुकीत ५० टक्के पेक्षा कमी मतदानाची नोंद झाली.

 दोन्ही तालुक्यातील दहा गावात विशेष पथक नियुक्त करून त्या परिसरातील मतदारांची जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. याशिवाय मतदार संघात बीएलओ मार्फत घरपोच मतदार स्लिप वाटप करण्यात आल्या आहेत. तरी जास्तीत जास्त मतदारानी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रान्ताधिकारी मते व तहसीलदार सांगडे यांनी ही माहिती देताना केले.