जगाच्या न्यायालयात ईश्वर हे न्यायाधिश – ढोक महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम चंद्र यांच्या १४ वर्षाच्या वनवासामुळे वीरह झालेल्या प्रजाजना सह मुक्या जनावरांनाही यातना झाल्या. त्यांना वनवासात सोडण्यासाठी गेलेल्या अश्वानी देखील काही काळ चारापाणी वर्ज्य केले. जेथे केवळ मनुष्यच नव्हे तर पशुपक्षी ही संस्कारीत आहेत. असा आपला हिंदूस्थान जगात सर्व श्रेष्ठ देश असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले.

आमदार मोनिका राजळे यांच्या संकल्पनेतून दिवंगत आमदार राजीव राजळे मित्र मंडळाने शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून रामायणाचार्य ढोक महाराजांच्या मधूर वाणीतून सुरु असलेल्या श्रीरामकथा ज्ञान, यज्ञ सोहळ्यात शुक्रवारी भरत भेट कथा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ढोक महाराज म्हणाले, जगाच्या न्यायालयात ईश्वर हे न्यायाधिश असून साधूसंत हे ईश्वर आणि भक्त यांच्यात समन्वय साधणारा दुवा म्हणून वकिलाची भूमिका पार पाडतात.

योग्य वकील निवडण्याचे स्वातंत्र्य भाविक जनतेला असून त्यांनी इष्ट देवतेचे दर्शन घडविणार्‍या योग्य वकिलाचा शोध घेऊन आपले जीवन अधिक समृद्ध करण्याची गरज व्यक्त केली. सजीवाचा मृत्यू हे अटळ सत्य असून मनुष्याने मृत्यूनंतर देखील देहदान व अवयव दान करून इतरांच्या उपयोगी पडावे. त्यामुळे आपले जीवन सार्थकी लागेल.

खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम महाराज झिंजूर्के, पैठणचे गोसावी महाराज, भागवताचार्य दिनकर महाराज आंचवले, सुडके महाराज, तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकार राजेश कदम, परिविक्षाधिन तहसीलदार राहूल गुरव, नायब तहसिलदार रविद्र सानप सह राधेराधे सत्संग मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते ग्रंथपुजन व आरती करण्यात आली.