अभिलाषा न ठेवता केलेली भक्ती महत्वपूर्ण – कौशिक महाराज

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : जीवनात परमेश्वर भक्ती सर्व श्रेष्ठ आहे. मनात कोणतीही अभिलाषा न ठेवता केलेली भक्ती महत्वपूर्ण असते. त्यामुळे प्रत्येकाने आपण संत बनू ही मनोकामना मनात न ठेवता परमेश्वर भक्ती करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र मथुराधाम येथील भागवत कथेचे गाढे अभ्यासक परमपूज्य कान्हा कौशिकजी महाराज यांनी केले.      

      येथील पुरोहित परिवाराच्या वतीने शहरातील माहेश्वरी समाज सेवा मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या  ‘ नानीबाई का मायरा ‘ या अभिनव कथा सोहळ्यात  पहिले पुष्प गुंफताना कौशिकजी महाराज बोलत होते.
       या निमित्ताने सकाळी शहरातील विविध भागातून  महाराजांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

       यावेळी कौशिकजी महाराज  म्हणाले , आजच्या तरुण पिढीत चंगळवाद मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. त्यामुळे सध्याच्या युवक वर्गाने थोरा मोठ्यांच्या  जीवन चरीत्रापासून  प्रेरणा घेवून किमान चांगले वागून समाजात धार्मिक भाव जोपासला पाहिजे. आखेगावच्या सद्गुरू श्री जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक हभप राम महाराज झिंजुर्के, आमदार मोनिका राजळे, श्री रेणुका माता मल्टी स्टेट क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.प्रशांत भालेराव, महेश फलके, सुनील रासने, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन व दीप प्रज्वलन करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. श्री जोग महाराज सेवा शिक्षण केंद्राच्या बाल वारक-यांनी सादर केलेल्या पाऊलीने परिसरातील भाविक मंत्रमुग्ध झाले होते.