गोदावरी खोरे दूध संघातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १२ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सुमारे पाचशेहून अधिक कर्मचान्यांनी या शिबिराचा लाभ घेत विविध आजारांची तपासणी करुन घेतली.

संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्याहस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. संघाच्यावतीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना परजणे यांनी कोणत्याही संस्थेत अथवा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शारीरिक स्वास्थ्य चांगले व सुदृढ असेल तर काम करताना त्यांच्यात उत्साह दिसून येतो. पर्यायाने कामकाजात सुसूत्रता निर्माण होऊन संस्थेच्या प्रगतीस देखील हातभार लागतो.

प्रत्येक संस्थेमध्ये अथवा कंपन्यांमध्ये अशा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करणे आजच्या काळाची मोठी गरज निर्माण झालेली असल्याचे सांगून सद्या वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात रोगनिदान आणि आरोग्य तपासण्या अत्यंत खर्चिक झालेल्या असल्याने सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना बाहेर तपासण्या करुन घेणे शक्य होत नाही म्हणून गोदावरी दूध संघात दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचेही परजणे यांनी सांगितले.

नाशिक येथील अपोलो हॉस्पीटलचे मार्केटींग व सेल्स विभागाचे व्यवस्थापक निलेश परजणे, कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संकेत जुमडे, डॉ. मंगेश गोडसे, डॉ. प्रसाद मोरे, डॉ. वैशाली पगार, डॉ. शिल्पा बेरा, डॉ. सोमदत्ता कर, नेत्र सल्लागार डॉ. कार्लेकर, डॉ. धिरज भदाणे, डॉ. गणेश डोखे यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासण्या करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांना संघाचे कामगार कार्यालयाचे कचरु भागवत, ज्ञानेश्वर रांधवणे, दुर्गा बारे, पूनम लोखंडे, कृष्णा संवत्सरकर यांनी सहकार्य केले. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी आभार व्यक्त केले.