हातगावला चोऱ्यांचा सुळसुळाट, एकाच रात्री झाल्या ५ ठिकाणी चोऱ्या

सोने व रोख रकमेसह अडीच लाखांचा ऐवज लंपास

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : तालुक्यातील हातगाव येथे शनिवारी पहाटे २ वा. चे दरम्यान ५ ठिकाणी चोऱ्या झाल्या असून या मध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे अडीच लाखांवर ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.        

याबाबत समजलेली माहिती अशी की,  शनिवारी २ वाजेचे सुमारास  गावातील भर पेठेत धनगर गल्लीत पांडुरंग रामकिसन नाचन हे आपल्या सर्व कुटुंबासह  उन्हाळ्याचे दिवस असल्याने  घराच्या गच्चीवर  झोपले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचा चोरट्यानी कडी कोंडा तोडून घरातील कपाट उघडून त्यातील अंदाजे २३ ग्रॅम सोन्याचे दागिने व ४ भाराची चांदीची हातातील साखळी आणि ९ हजार रुपये रोख असे एकूण मिळून जवळपास अडीच लाखांच्या पुढचा ऐवज चोरून नेला.

चोरट्यानी जात असताना शेजारीच रहात असलेल्या बाप्पासाहेब नाथा देवढे यांच्या ही घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करत १००० रुपये चोरुन पुढे काकासाहेब कचरू जऱ्हाड हे आपल्या पत्नीसह घरासमोर झोपले असता पत्नीच्या गळ्यातील ७ ग्रॅमची सोन्याची पोत तोडून नेत असताना त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी विरोध करत चोरट्याचे मनगट धरले व आरडाओरड केली. मात्र जोराचा हिसका मारून चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. एवढे होऊन ही शिवाजी लक्ष्मण काळे व शेवगाव मार्गावरील मदन वीर यांच्या ही घरात चोरट्यांनी प्रवेश केला.

मात्र या दोन्ही ठिकाणी चोरट्यांना काही मिळाले नाही. याबाबत माहिती समजताच गावातील ग्रामस्थ घटनेच्या ठिकाणाकडे धावले. सदर घटनेची माहिती पोलिसांना समजताच बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार राजु ससाणे हे आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी हजर होऊन घडलेल्या घटनेची माहिती घेत श्वान पथकास बोलावून घेऊन तपास केला असता जिथ पर्यंत माग निघाला तिथ पर्यंत श्वान जाऊन थांबला. या चोऱ्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.