कोपरगावमध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा टक्का वाढला सरासरी ६५ टक्के मतदान – बालाजी क्षिरसागर 

कोपरगाव प्रतिनिधी दि.१३ : शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले त्यात कोपरगाव तालुक्यातून सरासरी ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजवल्याची माहीती सहायक निवडणूक अधिकारी बालाजी क्षिरसागर व तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी दिली. 

 कोपरगाव तालुक्यात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सरासरी ५९ टक्के मतदान झाले होते. त्यात खासदार सदाशिव लोखंडे यांनी विजय मिळवला होता या निवडणुकीत खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उत्कर्षा रुपवतेसह २० आहे. ऊमेदवारामध्ये शिर्डी लोकसभेसाठीची चुरस असुन त्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघातून दिवसभरात झालेले मतदान लक्षवेधी व वाढलेली टक्केवारी कोणाला फायद्याची ठरते हे निकालावरून कळणार आहे. 

 दरम्यान कोपरगाव तालुक्यात सकाळपासून मतदारांनी काही मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी केली होती. तर तालुक्यातील अंदाजे ५० मतदान केंद्रावर सायंकाळी ६ नंतरही मतदान सुरु असल्याने तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ६५ पेक्षा अधीक होण्याची शक्यता सहाय्यक निवडणूक अधिकारी बालाजी क्षिरसागर व तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी दिली.

ते पुढे म्हणाले दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले तालुक्यातील रवंदा व ब्राह्मणगाव येथील मतदान क्र ९ आणि ४३ वरील व्हिव्हीपॅट बंद पडले होते तसेच संवत्सर येथील बिरोबा चौक येथील ७५ नंबर मतदान केंद्रावर व्हिव्हीपॅट बंद पडल्याने काही काळ मतदानासाठी व्यत्यय आला माञ तांञीक दूरूस्ती करुन मतदान पुर्ववत झाले. सकाळी ११ वाजे पर्यंत २०. ५४ टक्के मतदान झाले तर दुपारी एक वाजेपर्यंत ३२.८५ टक्के मतदान  झाले. 

 सकाळी ७ ते सायंकाळी पाच पर्यंत ५७.३६ टक्के मतदान झाले आहे. तसेच सायंकाळी ५ ते ६ पर्यंतची निश्चित आकडेवारी आली नसली तरीही सरासरी ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी बालाजी क्षीरसागर व तहसीलदार संदीपकुमार भोसले तालुक्यातील सर्व मतदार केंद्रांवर आपले लक्ष ठेवून होते. ज्या ज्या ठिकाणी मतदान प्रक्रियेत अडचणी येतील त्याचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी तात्काळ निरसन केले.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी ग्रामीण भागामध्ये चोख  बंदोबस्त ठेवला असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडून आला नाही. मतदान प्रक्रिया शांतते पार पडली. रात्री उशिरा शहरातील निवडणूक कार्यालयाच्या मध्यवर्ती ठिकाणी विविध टेबलवर मतदान यंत्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती.समता पतसंस्था, समता चॅरिटेबल ट्रस्ट,तालुका मर्चंट असोसिएशनचे वतीने शहरातील मतदान केंद्रावर जलपान सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. राञी उशिरापर्यंत मतपेट्या जमा करण्याचे व त्यांच्या व्यवस्थेचे काम कर्मचारी करीत होते. 

 सुशिक्षित व नोकरदार वर्गाने  सलग आलेल्या  सुट्ट्यांचा फायदा घेत बाहेरगावी पर्यटनाला  व घरगुती कामाला महत्त्व देत मतदानाकडे पाठ फिरवली तर कष्टकरी, शेतमजूर, अशिक्षित नागरीकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावत देशाप्रती कर्तव्य केले म्हणुनच मतदानाचा टक्का वाढला.