चेअरमन संभाजी शिंदे व संचालक बाळासाहेब पवार यांना  ३१ में पर्यंत पोलिस कोठडी 

शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : शेवगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अर्थदीप मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड या संस्थेने अधिक व्याजाचे आमिष दाखवून शेवगाव व परिसरातील  शेकडो लोकांना खाती उघडण्यास उद्युक्त करून अल्पावधीत कोटयावधीच्या ठेवी गोळा केल्या, मात्र लोक पैसे काढण्यासाठी आले तेव्हा टोलवाटोलवी होऊ लागली.

पैशाची वारंवार मागणी करूनही व्याजही नाही आणि ठेवीची रक्कम ही मिळेना म्हणून शेवगावच्या सेवानिवृत्त शिक्षिका नर्मदा कल्याणराव काटे (वय ५९) यांनीअखेर निधी संस्थेच्या संचालका विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात काल रात्री साडेदहाला रीतसर फिर्याद दाखल केल्यानंतर शेवगाव पोलिसांनी दोघा संचालकांना अटक करून आज बुधवारी (दि २२ ) अहमदनगर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना ३१ में पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

सदरचा गुन्हा दाखल करणे संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक यांचेकडून मंजुरी घेण्यात आली आहे. श्रीमती काटे यांची तब्बल ९०  लाख ७३  हजार १२८ रुपयाची गुंतवणुक या संस्थेत आहेत.

श्रीमती काटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आपल्या ठेवीच्या परतव्यासाठी सन 2022 मध्ये व 23 मध्ये वारंवार या निधी संस्थेत जाऊन संचालक मंडळास भेटून ठेवीची रक्कम व व्याजाची मागणी केली असता त्यांनी आपणास आज देतो उद्या देतो असे म्हणून वेळोवेळी पुढील वायदे देत ठेवीची मूळ रक्कम अथवा व्याज देण्यास टाळाटाळ केली आहे तसेच या संस्थेचे चेअरमन  संभाजी विठ्ठल शिंदे यांनी अभीद्य बँक अहमदनगर या बँकेचे चार चेक त्यांच्या स्वतःच्या सहीने दिले . मात्र ते चेक काटे यांनी  जिल्हा सहकारी बँकेच्या खात्यामध्ये भरले असता सदरचे चारही चेक वटले गेले नाहीत.

त्यानंतर देखील अनेक वेळा त्यांच्याकडे ठेवीची रक्कम व व्याजाबद्दल मागणीचा पाठपुरावा केला. तरीही त्यांनी अद्याप पावेतो कोणतीही रक्कम दिलेली नसून सदर संस्थेच्या संचालक मंडळाने आपला  विश्वास संपादन करून त्यांच्या निधी संस्थेमध्ये मुदत ठेव पावत्या करायला सांगून जास्त टक्केवारीवर परतवा देण्याचे अमिष दाखवून त्यांच्या संस्थेमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून आपल्या पैशाचा अपहार केला आहे. गुंतवलेले पैसे अथवा त्याच्या व्याजापैकी एकही रक्कम परत केली नसून फसवणूक केली आहे. म्हणून अर्थदीप मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड या संस्थेच्या संचालक मंडळा विरुद्ध अप्परपोलीस अधीक्षक यांचे मंजुरी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या  मार्गदर्शनाखाली पोसई अमोल पवार करत आहेत.