कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : नुकतेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक तिरसनवार यांनी आकस्मिक / प्रासंगिक पिण्याचे पाणी हक्क प्रस्ताव मराठवाडा परिसर गावांकरीता पिण्यासाठी उन्हाळी आवर्तन मागणी आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील गोदावरी उजव्या व डाव्या सिंचन पाट पाणी नियोजन पूर्णपणे कोलमडले.
वास्तविक पाहता कोपरगाव राहता तालुक्यातील पाटबंधारे खात्याने एक पाणी सिंचन रोटेशन कमी करून मे महिन्यात सोडण्याचे नियोजन केले होते. त्यात प्रथम पिण्याचे पाण्याचे नियोजन पूर्ण झाले व नंतर शेती सिंचन चालू झाल्याचं बघूनच मराठवाडयातील काही शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी स्टंटबाजी करून, वास्तविक पाहता, जे पाणी पुर्वींचे रब्बी आर्वतनांची बचत करून वाचवले होते ते पाणी मुख्यमंत्री व प्रशासनाची दिशाभूल करून मराठवाड्यात वळवण्यात आले आहे.
वास्तविक पाहता मराठवाड्यासाठी जी धरणं आहेत ती पुर्वींचं कोरडी ठाक झालेली आहेत. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणातून यापूर्वी जायकवाडी धरणामध्ये तीन टीएमसी पाणी नदीद्वारे समन्वय पाणी हक्क कायद्यानुसार गेलेले होते. हे सर्व घडत असताना कोपरगाव व नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी फक्त बघायची भूमिका घेतली आहे. स्थानिक प्रतिनिधी आजी-माजी आमदार यांनी साधारणतः दीड टीएमसीचे पाणी वाचवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत . त्यांच्या या शुन्य कृतीने परिसरातील शेतकरी, व्यापारी व जनतेचे फार मोठे नुकसान झालेले आहे.
मराठवाड्यातील काही मोजक्या शेतकऱ्यांनी केलेला गुडघाभर पाण्यातील जलसमाधी व लोकसभेसाठी मतदान न करण्याचा स्टंट तेथील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या कानाशी लागून पाणी पळवले. हे सर्व घडत असतांना आपले लोकप्रतिनिधी फक्त बघायची भूमिका करत होते त्यांचा कोपरगाव काँग्रेस कमिटी तर्फे जाहीर निषेध करतो असे नितीन शिंदे म्हणाले.