छत्रपती शिवरायांच्या विचारानुसार परिसराचा विकास साधू – खासदार लंके

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : कामे सांगत रहा, कायम संपर्कात रहा, मी खासदार झालो असा अहम भाव मला वाटता कामा नये. लंके आपल्यातलाच आहे हीच भावना आपली रहावी, हेच नाते जपूया. माझ्यावर तुमचा अधिकार आहे . कामासाठी विनंती करायची नाही, तर अधिकारवाणीने कामे सांगा. कुठेही  जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका. सगळा समाज गुण्यागोंविदाने नांदायला हवा. अठरापगड समाजाला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापणाऱ्या छत्रपती शिवरायाचे आपण  मावळे आहोत सर्वांना बरोबर घेऊन सर्व मिळून परिसराचा विकास साधू असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी येथे केले.       

नगर दक्षिणचे नवनिर्वाचित  खासदार निलेश लंके शुक्रवारी आभार दौऱ्यानिमित्त शेवगावी आले असता येथील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलत होते. सायंकाळी पाच चा कार्यक्रम रात्री ९ला सुरु झाला. सर्वप्रथम त्यांनी स्व. गोपिनाथराव मुंढे यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून अभिवादन करुन सभास्थानी आले. तेथे डीजेच्या निनादात फटाके तोफाची आतषबाजी झाली.

खा. लंके म्हणाले, थोडी कळ काढा माझ्या इतका भाग्यवान कोणी नाही. निवडणुक झाल्यापासून लोकांनी मला डोक्यावरच घेतलय. कोणी खाली ठेवायला तयार नाही. टप्प्या टप्याने सर्वबाहेर काढू. तुम्ही मला सेवेची संधी उपलब्ध करून दिली आता पुढील काळात मी तुमचा सेवक म्हणून काम करणार आहे. सत्ता ही मिरवण्यासाठी नसते, तर ती सर्वसामान्याच्या कामासाठी असते. एका बलाढय अशा आसूरी ताकदीला गाडून माझ्या सारख्या सामान्य माणसाला आपण  संसदेत पाठवले. आता जबाबदारी माझी आहे. सर्व घटक पक्षानी मनापासून काम केले. सहाव्या फेरी पर्यंत मागे होतो. दुपार पर्यंत वेगळे स्टेटस् ठेवणारे सत्काराला पुढे येत आहेत. तेव्हा त्रास घेऊन काम करणारा आपला कार्यकर्ता नाराज होतो. फक्त आचार संहिता संपू द्या. प्रशासनातील माणसे आपलीच आहेत सर्व प्रलंबित कामे प्राधान्य क्रमाने मार्गी लावली जातील अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.

           बंडू रासने यांनी जीवाला जीव देणारा माणूस खासदार झाला. अशा शब्दात स्वागत करून परिसराच्या पाण्याचा व विजेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. उबाठा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास गोल्हार यांनी विरोधकाचा चांगलाच समाचार घेत लेकाची जिरवली, आता बापाची जिरवायची आहे. जिल्ह्यात १२ चे १२ आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणायचे असे काम करायचे या कामासाठी खासदार लंके यांना आपण पाठबळ द्यावे असे आवाहन केले.

शरदश्चंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस ॲड. प्रताप ढाकणे म्हणाले, खा. लंके नशीब घेऊनच आले आहेत. लोकभावना व मन समजून घेणाऱ्या कार्यकर्त्यास लोक डोक्यावर घेतात.  ज्याला शक्तीची घमेंड आहे त्याची मस्ती समाज उतरविल्याशिवाय रहात नाही. धन शक्ति पेक्षा जनशक्ती मोठी असल्याचे शरद पवार साहेबानी दाखवून दिले आहे. त्यांनी नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा मताधिक्याने विजयी करून जिल्ह्याचा श्वास मोकळा केला आहे.     

  यावेळी वजीर पठाण, बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड, अविनाश देशमुख यांचीही भाषणे झाली. राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष, शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिष भारदे, शेवगाव राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष नंदू मुंढे, शरद सोनवणे, माजी सरपच राहूल मगरे, एजाज काझी, अप्पा मगर, एकनाथ कुसळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे , राहुल वरे, ॲड. शिवाजी लांडे पाटील, सुनिल काकडे, यांचेसह हजारो नागरिक उपस्थित होते. दिपक कुसककर यांनी सुत्र संचलन केले केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी आभार मानले .

सायंकाळी पाचचा आभार कार्यक्रम ९ वाजता सुरु झाला. कार्यालयातील कार्यक्रम साडेअकराला संपल्या नंतर खा. लंके यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पावन गणपतीचे पूजन केले.  बाजार समिती समोर अमर पुरनाळे यांनी डीजे लावून क्रेनच्या साह्याने मोठ्ठा हार घालून फुलाची उधळण करत तर मिरी रस्त्यावर बंटी म्हस्के यांनी डीजेच्या तालात जेसीपी ने फुलांची उधळण करत फटाके तोफांची आतषबाजी करत स्वागत केले .तेथील इदगाह मैदानावरील दर्ग्यावर खा. लंके यांनी चादर चढविली. तेथून पैठण रस्त्यावरील आंबेडकर भवन व पुढे तळणी ग्रामस्थांचा सत्कार स्विकारून  घोटण येथील कालिका माता देवस्थानात देवीचे दर्शन घेऊन मल्लिकार्जून महादेवाला अभिषेक करून तेथील ग्रामस्थाचा सत्कार स्विकारून रात्री दोनला राहूरीकडे मार्गस्थ झाले.