कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : शहराच्या मध्यवर्ती आयेशानगर भागात शहर पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या गोवंश जातीच्या सहा जनावरांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत ६० रुपये किमतीचे ५०० किलो गोमांस मिळून आले. शकील लकीरा बागवान रा. सुभाषनगर या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई १७ जून रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील आयेशानगर भागातील खंदकनाल्याच्या जवळ असलेल्या काटवनात गोवंश जातीची जनावरे अवैध कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने उपाशीपोटी बांधून ठेवलेले आढळले. तसेच पत्र्याच्याशेड मध्ये गोवंश जातींचे जनावरांचे धारदार कोयत्याने तसेच कुऱ्हाडीने कत्तल केल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम,प्राण्यांना क्रूरतेने वागविन्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सातत्याने गोवंश जातीच्या जनावरांची खुले आम कत्तल केली जाते. राज्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करणे गुन्हा असताना वारंवार या घटना घडत आहे. त्यामुळे या अवैध कत्तल करणाऱ्याना देखील कोणाचा आशीर्वाद आहे याची पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलीस अधिकाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे बोलले जात आहे.