चार दुकाने फोडून लुटला ६ लाखांचा ऐवज

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : अलीकडे काही दिवसात शेवगाव शहरासह तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असून गुरुवारी पहाटे तीन च्या दरम्यान तालुक्यातील आखेगावला एकाच रात्रीत चार दुकाने फोडून मंदिराच्या दानपेटी वर देखील चोरट्यानी हात मारला.

        याबाबत माहितीअशी कि, आखेगावाला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बस स्थानकावरील अमोल पायघन यांच्या छत्रपती सेतूचे सेंट्रल लॉक तोडून शटर पूर्णपणे उचकटून  रोख व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आर, तसेच दुकानातील बरेचसी कागदपत्रे चोरटे घेऊन पसार झाले.

श्रीधर पायघन यांनी दिलेल्या फिर्यादीत, अज्ञात तीन चोरट्यांनी कृषी सेवा केंद्रातून ४ लाख ७० हजार ६०० रुपयांची बियाणे, ग्राहक सेवा केंद्रातून १ लाख ३० हजार २५० रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचे सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे बीबीआर, बालाजी मेडिकल तसेच रिद्धी सिद्धी मेडिकल येथून १ हजार रुपये रोख व २ हजार रुपये किमतीचे कॉस्मेटिक सामान तसेच काटेवाडी शिवारातील हनुमान मंदिराची दानपेटीतील अंदाजे ५ हजार रुपये असे एकूण ६ लाख १८ हजार ८५० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचे म्हटले आहे.

  सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस यंत्रणेने येऊन घटनास्थळाची पहाणी करून  श्वान पथक बोलाविण्यात आले. या परिसरात दिवसेंदिवस  मोठया प्रमाणात चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.