शेवगावात कृषी सेवा केंद्र चालकांचा बेमुदत बंद

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांना खता सोबत लिंकिंग मटेरियल घ्यावे लागत असल्याने त्रस्त केंद्र चालकांनी जोपर्यत अशा लिकिंग मटेरियलची सक्ती थांबत नाही. तोपर्यंत आज बुधवार (दि.३ ) पासून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन लिंकिंगची सक्ती त्वरित उठविण्याची मागणी शेवगाव तालुका रासायनिक खत विक्रेते संघटनेने जिल्हाधिकाऱ्या कडे केली आहे. तहसीलदार प्रशांत सांगडे, पंस कृषी अधिकारी राहूल कदम यांचेकडे  निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय स्तरावर या पद्धतीचा सोक्ष मोक्ष लावावा. शेवगाव तालुक्यात एकूण १७० नोंदणीकृत कृषी सेवा दुकानदार आहेत. या सर्व दुकानदारांना कंपनीने सक्तीने दिलेले लिंकिंग मटेरियल धूळ खात पडून आहे. तालुक्यातील  प्रत्येक दुकानदाराकडे किमान दोन तीन लाखाचे तर सर्वांकडे मिळून एकूण किमान दोन कोटी पेक्षा जास्त किंमतीचे लिंकिंग मटेरियल पडून आहे. याबाबत दुकानदारांनी कंपनीकडे तक्रार केली असता आम्ही खताबरोबर लिंकिंग मटेरियल देत नसल्याचा ते कांगावा करतात.

तीन महिन्या पूर्वी  जिल्हाधिकारी यांच्या समवेत सर्व कंपनीच्या प्रतिनिधी सह झालेल्या बैठकीत लिंकिंग करून नये, असे स्पष्ट पणे सांगण्यात येऊन सुद्धा कंपन्यांनी व होलसेलर यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून लिंकिंग सुरु केले आहे. कृषी सेवाकेंद्र चालक तथा किरकोळ दुकानदार व शेतकरी वर्गात या लिकिंग वरून मोठे वाद होतात. या वादात अनेकदा विविध संघटनाही उतरतात. शेतकऱ्यांशी असलेल्या नेहमीच्या संबंधामुळे असे वाद परवडणारे नसतात. शासनाच्या खताला अनुदान आहे. तरीही लिकिंग करण्याचे कारणही नसावे.

कंपन्या व होलसेल विक्रेते मात्र नको असलेल्या उत्पादना सोबत सक्तीने लिंकिंग करतात. हे लिंकिग बंद व्हावे. शासनाने त्यासाठी ठोस निर्णय घ्यावा. तसेच आम्हाला मुबलक व विना लिंकिंग मालाचा पुरवठा करावा अशी विनंती करण्यात आली आहे. तसे न झाल्यास शेवगाव तालुका रासायनिक खते व्यापारी संघटनेच्या वतीने जोपर्यंत रासायनिक खता सोबत लिंकिंग बंद होत नाही तोपर्यंत शेवगाव तालुक्यातील दुकाने आज बुधवार दिनांक पासून बेमुदत बंद राहतील याची शासनाने नोंद घ्यावी असे नमुद करण्यात आले असून उद्‌या  गुरुवारी संघटनेचे  शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची समक्ष भेट घेणार आहेत.

       निवेदनावर  संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांचे सह जगदीश धूत , बंडू सागडे, संदीप जावळे, संजय लांडे, पांडुरंग मोटकर, राम नारायण लाहोटी, अरुण खंडागळे, मोटकर मेजर, तुळशीराम विघ्ने, सौरभ पवार, रामनाथ केसभट, संभा गावडे, भारत पठाडे आदि पदाधिकाऱ्यांच्या सहया आहेत.