बालमटाकळी संस्थेच्या अध्यक्षपदी राजपुरे तर उपाध्यक्षपरी भिसे बिनविरोध

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ :  राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या व आर्थिक दृष्ट्या मोठी उलाढाल असणाऱ्या तालुक्यातील बालमटाकळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जेष्ठ कार्यकर्ते रामनाथ राजपुरे यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय भिसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल उभयताचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

  शेवगावातील दुय्यम निबंधक कार्यालयात पदाधिकारी निवडीसाठी या संस्थेच्या संचालक मंडळाच्या बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीत सभापती  पदासाठी राजपुरे यांच्या नावाची सूचना हरिश्चंद्र घाडगे यांनी मांडली. त्यास विश्वंभर गरुड यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्ष पदासाठी भिसे यांच्या नावाची सूचना उमेश घाडगे यांनी केली. त्यास रोहिदास भोगले यांनी अनुमोदन दिले.

दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक विजयसिंह लकवाल यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवडी नंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत निवडीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सरपंच डॉ. राम बामदळे, ज्येष्ठ नेते मोहनराव देशमुख, कासम शेख, प्रशांत देशमुख, माणिक शिंदे, अशोक वैद्य, अर्जुन राजपुरे, रतन देशमुख, छगन राजपुरे, परशुराम  घोरपडे, विष्णुपंत वाघुंबरे, धनंजय देशमुख आदींसह संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.