शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : तालुक्यातील दहिगाव ने येथील कृषी विज्ञान केंद्र , श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था व ‘आत्मा’ अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने दहिगाव ने येथील कृषी विज्ञान केंद्रात पार पडलेल्या ‘ शेतकरी – शास्त्रज्ञ संवाद ‘ कार्यक्रमात आत्माचे प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कांदा, केळी, ऊस, सोयाबीन, उडीद, तुर, कपाशी उत्पादन वाढीबाबत शासनाच्या विविध योजनांची तसेच नैसर्गिक शेती व कृषी विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी एकत्र येऊन गटाची व शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करावी असा सल्ला दिला. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शामसुंदर कौशिक यांनी सद्य परिस्थितीमध्ये खरीप हंगामातील प्रमुख पिके तुर, उडीद, सोयाबीन, कपाशी या पिकासाठी वापरायच्या विविध तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले.
नंदकिशोर दहातोंडे विषय तज्ञ यांनी खरीप कांदा केळी लिंबू व नवीन फळबाग लागवड याबाबत प्रबोधन केले .यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रास भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विविध प्रकल्प व पिकाची पहाणी केली. कृषी विज्ञान केंद्राचे इंजिनियर राहुल पाटील, माणिक लाखे, नारायण निंबे, डॉ.चंद्रशेखर गवळी, प्रकाश बहिरट, निलेश भागवत आदी सह परिसर व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. विषय विशेष तज्ञ सचिन बडघे यांनी सूत्रसंचालन केले.