शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : तालुक्यातील पिंगेवाडी येथे गुरुवारी दिवसा घरफोडी झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत अज्ञात चोरट्याने साठ हजार रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लुटून नेल्याची फिर्याद महादेव मुरलीधर मुंडे रा.पिंगेवाडी यांनी शेवगाव पोलिसात दाखल केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, आपण आपल्या कुटुंबासह पिंगेवाडी येथील आपल्या शेतात गेलो असताना गुरुवारी दिनांक ४जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास अज्ञात चोरट्याने आपल्या शेवगाव रस्त्यावरील राहते घराच्या बंद दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व साठ हजार रुपयांची रोख रक्कम लांबविली आहे.
ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनेचा तातडीने तपास करून चोरट्यांना गजाआड करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. याबाबत पोलिसात बीएनएसएस २०२३ चे कलम ३३१ (३), ३०५ ( ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान ही घटना गुरुवारी दिवसाढवळा घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.