आमदार काळेंनी लाडक्या बहिणींसाठी सुरु केली घरपोहोच सेवा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : महायुती शासनाने महिलांसाठी १ जुलै पासून सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी मागील आठवड्यापासून सेतू केंद्रावर महिला भगिनींची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे महिला भगिनींना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या अडचणींची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी संपूर्ण कोपरगाव मतदार संघात सोमवार (दि.०८) पासून आपल्या यंत्रणेमार्फत लाडक्या बहिणींसाठी घरपोहोच सेवा सुरु केल्यामुळे महिला भगिनींमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

महायुती शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांना अडचणी येवू नये यासाठी आ. आशुतोष काळे यांनी सहाय्यता केंद्र सुरु करून महिलांना योग्य मार्गदर्शन करून त्याचे अर्ज भरून घेण्यासाठी सहकार्य केले आहे. या योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही व जास्तीत जास्त पात्र महिला भगिनींना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ मिळावा यासाठी महायुती शासनाने या योजनेचे काही नियम व अटी शिथिल केल्या आहेत.

यामध्ये अधिवास प्रमाणपत्र व उत्पनाच्या दाखल्या ऐवजी कुटुंबाच्या शिधा पत्रिका अर्थात रेशनकार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे महिला भगिनींना या योजनेचा लाभ घेतांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील महिला भगिनींना सविस्तर मार्गदर्शन करून मतदार संघातील प्रत्येक गावात आपल्या यंत्रणेमार्फत महिला भगिनींच्या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरून घेतले जात आहे. कौटुंबीक जबाबदारी सांभाळून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी अनेक महिला भगिनी सेतू केंद्रावर जावू शकत नव्हत्या.

त्यामुळे अशा महिला भगिनींसाठी आ. आशुतोष काळे यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वच पात्र महिला भगिनींना आपले अर्ज वेळेत भरण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळे मतदार संघातील महिला भगिनींनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. आ. आशुतोष काळे यांनी गावागावात आपली यंत्रणा उभी केल्यामुळे सेतू केंद्रावर होणारी गर्दी कमी होवून सेतू केद्रांचा देखील श्वास मोकळा झाला आहे. त्यामुळे अनेक शासकीय दाखले घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखले देखील वेळेत मिळू लागले आहेत.

मतदार संघाच्या विकासाचे दायित्व घेतलेल्या आ. आशुतोष काळे यांची यंत्रणा नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. दोन तीन वर्षापूर्वी आलेले जीवघेणे कोविड सारखे संकट असो की, अतिवृष्टी, महापूर असो आ. आशुतोष काळे व त्यांची  यंत्रणा मदतीसाठी नेहमीच पुढे असते. त्यामुळे महायुती शासनाने महिला भगिनींसाठी घेतलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला भगिनी वंचित राहणार नाही याची आ.आशुतोष काळे यांनी घेतलेली खबरदारी व उभ्या केलेल्या यंत्रणेचे संपूर्ण मतदार संघात कौतुक होत आहे.