नवीन मतदारांना नोंदणी करण्याचे तहसीलदार सांगडे यांचे आवाहन

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : येत्या २५ जुलै पर्यंत ज्यांचे वय वर्ष १८ पूर्ण होणाऱ्या सर्व युवकांनी आपले नाव मतदार यादीत  समाविष्ट करून घ्यावे असे आवाहन शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, राज्यात सध्या निवडणूक आयोगाने मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमे अंतर्गत ज्या युवकांचे वय २५ जुलै २०२४ ला १८ वर्ष पूर्ण होत असेल अशा सर्वांनी आपआपल्या गावात नेमून दिलेल्या मतदान केंद्र स्तरीय (बी.एल.ओ.) अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणीचा फॉर्म भरून त्याचे सोबत वयाचा पुरावा देऊन आपले नाव नवीन मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे.

  तसेच ज्यांचे कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशांनी त्यांची नावे कमी करण्यासाठीचा फॉर्म भरून मयताचे नाव कमी करून घ्यावे. त्याच बरोबर मतदार यादीत आपले नावात  काही चुक नसल्याची देखील खात्री करावी. चूक झाली असल्यास चुकलेल्या नावाची दुरुस्ती करून घ्यावी. अंतिम यादी २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.