अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशनच्या चेअरमन पदी सत्येन मुंदडा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : नुकत्याच अहमदनगर शहर सहकारी बँक, अहमदनगर येथे पार पडलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कोपरगावचे सत्येन सुभाष मुंदडा यांची एकमताने अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली तर उपाध्यक्षपदी पारनेर सैनिक बँकेचे श्री शिवाजी व्यवहारे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षस्थानी सहकार खात्याचे अधिकारी सिनारे साहेब उपस्थित होते. सत्येन मुंदडा यांच्या अध्यक्षपदाची सूचना सी. ए. गिरीश घैसास यांनी मांडली. सभेसाठी जिल्ह्यातील विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सहकार खात्याअंतर्गत १०१ चे वसुलीचे दाखले, नो ड्युज सर्टिफिकेट तसेच जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांचे अडीअडचणी सोडवून त्यांच्या सक्षमीकरणचे महत्त्वाचे काम असोसिएशनचे असते.

नूतन अध्यक्ष सत्येन मुंदडा हे कोपरगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आहेत तसेच ते लायन्स क्लब इंटरनॅशनल चे माजी जिल्हाध्यक्ष, कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक ,के जे सोमय्या कॉलेजचे कमिटी सदस्य अशा विविध संस्थेवर कार्यरत आहेत.  

कोपरगाव पीपल्स बँकेचे चेअरमन असताना त्यांनी बँकेत मोबाईल बँकिंग व यूपीआय सेवा सुरू केली होती. कमी वयात मोठी जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्ह्यातील बँकासाठी विविध कार्यशाळा, ट्रेनिंग कार्यक्रम आयोजित करून बँका सक्षम बनविण्याचा मनोदय नूतन अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी व्यक्त केला.   

याप्रसंगी मावळते अध्यक्ष गिरीश यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सी.ए. वसंतराव गुंड, विधिज्ञ अशोकराव शेळके, संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन वाकचौरे, प्रकाश राठी, राज्य फेडरेशनचे मेधाताई काळे, आशाताई मिश्किल व इतर सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.