शेवगाव येथे भरला बाल वारकरी वैष्णवांचा मेळावा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : आषाढी एकादशीनिमित्त येथील खंडोबानगर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व लोटस् प्री स्कूल, गॅलक्सी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवारी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीसह अनेक साधुसंतांच्या वेशभूषा साकारत बाल दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘सौर ऊर्जेचा वापर करा’, ‘पर्यावरण वाचवा देश वाचवा’, ‘स्वच्छता तेथे देवता’ असे सामाजिक संदेश देत विठू माऊलींचा नामघोष करत समाजिक उद्बोधन केले.

आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या वैष्णवांचा कुंभमेळाच. ही बाल दिंडी  मंगळवारी सकाळी आखेगाव रोड मार्गे खंडोबा नगरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आली. या दिंडी सोहळ्याचे उत्तम नियोजन लोटस् प्री स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा खांदाट व गॅलक्सी इंग्लिश स्कूलच्या स्वाती पाचरणे सहशिक्षिका यांनी केले. या बालचमुच्या दिंडीच्या मार्गावर महिलांनी फुलांच्या रांगोळ्यां घालून मार्ग सुशोभित केला. ठिकठिकाणी बाल वारकऱ्यांचे औक्षण करून स्वागत केले. ग्रामस्थ बहुसंख्येने या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.