नगरपरिषदेमधील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचारांची चौकशी करावी – अरुण मुंढे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानअंतर्गत शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने सुरु करावे किंवा त्या योजनेची फेर निवदा करुन संबंधीत कामात दिरंगाई करणा-यांवर योग्य ती कारवाई करावी, नगरपरिषदेमधील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचारांची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करून नगर परिषदेचे सोशल ऑडिट करावे यासह विविध मागण्यांसदर्भात भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे व नगरपरिषदेच्या माजी पदाधिका-यांनी आज गुरुवार दि.१८ पासून तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा दिला आहे. यावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने सुरु करावे किंवा त्या योजनेची फेर निवदा करुन संबंधीत कामात दिरंगाई करणा-यांवर  कारवाई करावी, नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा, शहरात सर्वत्र पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यावर तातडीने उपाययोजना करावी, बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट तसेच विविध चौकात वर्षापूर्वी कोटयावधी रुपये खर्च करुन उभारलेले हायमँक्स दिवे तातडीने सुरु करावेत, नगरपरिषदेच्या सर्व विभागाचे सोशल आँडीट करण्यात यावे, शहरामध्ये चुकीच्या पध्दतीने प्रस्तावित झालेला डीपीआरचे पुननिरीक्षण करण्यात यावे. अशा मागण्यांचा समावेश असून सर्व विषय मार्गी लागेपर्यंत उपोषणाबाबत तडजोड होणार नाही. असा इशारा मुंढे यांनी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांना पाठ विलेल्या निवेदनात दिला आहे.

यावेळी अरुण मुंढे यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैदय, रासपचे राज्य सचिव डॉ.प्रल्हाद पाटील, आत्माराम कुंडकर, विनोद मोहीते, माजी उनगराध्यक्ष वजीर पठाण, माजी नगरसेवक अजय भारस्कर, विकास फलके, दिगंबर काथवटे, शब्बीर शेख, संदिप म्हस्के, कैलास तिजोरे,अंकुश कुसळकर, अमोल सागडे, ॲड शाम कणगरे, तुषार पुरनाळे, भुषण देशमुख,बाळासाहेब डोंगरे, आदींसह पदाधिकारी सहभागी झाले. 

यावेळी अरुण मुंढे म्हणाले की, शहर पाणी पुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश देवून एक वर्षाचा कालावधी लोटूनही ठेकेदाराने हे काम सुरु केलेले नाही. यासंदर्भात तत्कालीन नगरपरिषद मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिका-यांना समक्ष भेटून निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्या समवेत त्यासंदर्भात दोनवेळा बैठका झाल्या. मात्र कामकाजात कुठलीही प्रगती झाली नाही. ठेकेदाराने अनामत रकमेची गँरंटी बनावट दिलेली असून त्याच्यावर फुसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बँक गँरंटीचा शहानिशा न करता ठेकेदाराला कार्यारंभ आदेश कसा दिला. यामागे काय मिलीभगत आहे ? याचा तपास करण्यात यावा. मानव सेवा एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असून त्यांची ही चौकशी करावी. तसेच जलशुध्दीकरण व जलकुंभासाठी दाखवलेल्या जागा तांत्रिक दृष्टया चुकीच्या असल्याचे ठेकेदाराने लेखी पत्र दिले आहे. तरी ही या कामाच्या निविदा का काढण्यात आल्या ? याची चौकशी होवून दोषींवर १५ दिवसांत कारवाई व्हावी व पाणी योजनेचे काम तातडीने सुरु करावे.

  यातील तीन विषय शासनदरबारी असून त्या संदर्भात शहानिशा करु. जे मुद्दे पालिकेच्या संबंधीत आहेत ते पूर्ण केले आहेत. आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली असून जे प्रश्न राहीले असतील त्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे. काही प्रशासकीय अडचणी सोडविल्यानंतर त्याबाबत मागण्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करु.
संतोष लांडगे,
प्रभारी , नगरपरिषद शेवगाव