कोपरगावमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खुन

 मयताच्या नातेवाईकांसह जमावाने पोलीसांना घेरले

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : कोपरगाव शहरातील आयेशा काॅलनी येथील सोहेल हारुन पटेल या २८ वर्षीय युवकाचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुन केल्याच्या घटनेने कोपरगाव हादरले. या घटनेने व्यथित झालेल्या मयत युवकांच्या नातेवाईकासह त्यांच्या  समाजबांधवांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून पोलीसांना घेरावा घालुन संबंधीत घटनेतील सर्व आरोपीला त्वरीत अटक करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. 

 या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मच्छिंद्र सोनवणे ऊर्फ मच्छू याच्या पत्नीशी सोहेल हारुन  पटेल यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याच्या कारणावरून सोहेल पटेल याला मच्छिंद्र सोनवणे ऊर्फ मच्छू, स्वप्निल गायकवाड, महेश कट्टे, योगेश जाधव उर्फ पोंग्या, विकी परदेशी व परदेशी यांचा एक मिञ नाव माहीत नाही यांनी  शहरातील टिळक नगर शेजारील भूमि अभिलेख कार्यालयाच्या परीसरातील टाॅवर रोड येथे एम एच १५ ई. ४७९५ या मॅजिक गाडीमध्ये सोहेल पटेल याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

तेथुन सदर मॅजिक गाडीमध्ये सोहेल पटेल याला घालुन कर्मवीरनगर व शंकरनगर शेजारील जावेद जमशेर शेख यांच्या मालकीच्या प्लाॅटमध्ये घेवून गेले. तिथे मच्छिंद्र सोनवणे ऊर्फ मच्छू, स्वप्निल गायकवाड, महेश कट्टे, योगेश जाधव उर्फ पोंग्या,  विकी परदेशी व परदेशी यांचा एक मिञ नाव माहीत यांनी सोहेल पटेल याला लाकडी दांडके, चालु, लोखंडी खिळे असलेल्या बांबुने जबर मारहाण करून गंभिर जखमी केले. 

सोहेल पटेल याला मारहाण करताना व तो किंचाळत असल्याचा आवाज कर्मवीर नगर व शंकरनगर परिसरात राहणाऱ्या नागरीकापर्यंत जात होता अनेकांनी घाबरुन आपले दारं खिडक्या बंद केल्या तर काही धाडशी नागरीकांनी सोडवण्यासाठी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात सोहेल पटेल निपचित पडल्यानंतर पोलीस घटनास्थळी धावून गेले. गंभीर जखमी झालेल्या सोहेल पटेलला शहराजवळील एस जे एस रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले असता सोहेल पटेल यांचा पहाटे चारच्या सुमारास उपचारा दरम्यान  दुर्दैवी मृत्यू झाला. सोहेल पटेल यांचा खुन झाल्याची चर्चा शहरात वाऱ्या सारखी परसरली.

 दरम्यान मयत सोहेल पटले याचा भाऊ शहारुख हारुन पटेल यांच्या तक्रारी वरुन मच्छिंद्र सोनवणे ऊर्फ मच्छू, स्वप्निल गायकवाड, महेश कट्टे, योगेश जाधव उर्फ पोंग्या,  विकी परदेशी व परदेशी यांचा एक मिञ नाव माहीत यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या  खुनाच्या गुन्ह्यातील तिघांना गजाआड केले  तर इतरांचा शोध सुरु आहे.

झालेली घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलुबर्मे, पोलीस उपाधिक्षक शिरिष वमने यांनी घटना स्थळी भेट देवुन आक्रमक झालेल्या  नातेवाईक व नागरीकांंची मनधरणी करीत वातावरण निवळण्याचा  प्रयत्न केला. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.