कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : संत सगदुरू गंगागिरीजी महाराज १७७ वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र पंचाळे ता.सिन्नर या ठिकाणी सुरू आहे. या सप्ताहात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित राहून महंत रामगिरिजी महाराज यांचे प्रवचन श्रवण करत आशीर्वाद घेतले.
अतिशय प्रशस्त आयोजन व गिनीज बुकमध्ये नोंद असलेला सप्ताह ही शेकडो वर्षांची परंपरा महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. योगिराज गंगागिरीजी महाराज आणि ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांचे सामाजिक ऐक्याचे व भक्तीचे सामर्थ्य असणारा हा भाविकांचा कुंभमेळा आपल्यासाठी ऊर्जेचे ठिकाण आहे अशी भावना सौ.कोल्हे यांनी व्यक्त केली.
मौलिक अध्यात्मिक विचारांचा ठेवा असणारा कोल्हे परीवार हा सराला बेटाशी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पासून जोडलेला आहे.तिसऱ्या पिढीतही सेवा हाच धर्म मानून कोल्हे परीवार सप्ताहास व सामाजिक धार्मिक कार्यास संजीवनी उद्योग समूह व वैयक्तिक माध्यमातून सेवा देण्याचे कार्य करतात. युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून स्व.शंकरराव कोल्हे मोफत फिरता दवाखाना सप्ताह स्थळी सुरू असून येणाऱ्या भाविकांना मोफत उपचार आणि मोफत औषधे देण्याची सेवा अव्याहतपणे सुरू आहे. या सेवेचे स्वागत भावीकांनी केले आहे. भाविकांच्या सेवेचा खरा आदर्श विचार कोल्हे यांनी जोपासत सप्ताहात येणाऱ्या अधिकाधिक भाविकांना मोफत सेवा देण्याचा मानस त्यांचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी विविध भागातून आलेले महंत, भाविक आणि सप्ताह कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सप्ताह कमिटीच्या उत्कृष्ठ नियोजनाचे सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी कौतुक केले.