२०१४ पासून आम्ही लाडक्या बहिणीला सांभाळले आता त्यांनी थांबावे, अन्यथा अपक्ष उभे राहणार – अरुण मुंडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ :  शेवगाव-पाथर्डी तालुक्यात लोकप्रतिनिधींनी सामान्य भाजप कार्यकर्त्या ऐवजी बगलबच्यांना पोसण्याचेच काम आतापर्यंत केल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींच्या विरोधात मतदार संघातून आवाज उठला असून आता बदल केल्याशिवाय पर्याय नाही अशी भाजप कार्यकर्त्यांची भावना झाली आहे, त्याची दखल पक्षालाही घ्यावी लागेल अन्यथा भाजपची ही जागा हातातून जाईल असा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी शेवगाव येथे आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात दिला.  

शनिवारी मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्याच्या आयोजित निर्धार  मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य होते. यावेळी मुंडे यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर नाव न घेता कडाडून टीका केली. लोकप्रतिनिधींच्या नात्यागोत्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. ज्यांची लायकी नाही अशा बगलबच्चांना त्या जवळ करतात. ज्यांची गल्लीत निवडून येण्याची क्षमता नाही अशांना तालुका सांभाळायला दिला आहे. त्यांना विरोध करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत,असले राजकारण आज पर्यंत कधी झाले नाही.

गावच्या सरपंचापासून जिल्हा परिषद, कारखाना, मार्केट कमिटी व आमदारकी अशी सर्व पदे आपल्या घरातच पाहिजेत. दलाल पोसण्याचे काम लोकप्रतिनिंकडून होत आहे. आम्हाला त्यांच्याविरुद्ध बोलण्याची वेळ का आली हेही पक्षश्रेष्ठींनी तपासून पाहावे. शासनाने लाडकी बहीण योजना आता सुरू केली परंतु २०१४ सालापासून आम्ही लाडक्या बहिणीला सांभाळले. आता त्यांनी थांबावे व आम्हाला आशीर्वाद द्यावा असे ते म्हणाले.

तसेच जे दहा वर्ष कुठेच नव्हते ते आता बाहेर आले आहेत. पंचवीस वर्षे सत्ता त्यांच्याकडे होती तेव्हा त्यांनी काही परिवर्तन केले नाही, आता जनतेपुढे आले आहेत आम्ही भाजपकडून लढणार नाहीत असे ते जनतेला सांगतात मात्र भाजप सरकारकडून १५० कोटी रुपये कारखान्यासाठी आणले ते यांना चालतात का अशा शब्दात मुंडे यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यावर टीका केली.

भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकूळ दौंड म्हणाले, २५ ते ३० वर्षांपासून आम्ही भाजपचे काम करीत आहोत त्यामुळे आम्हाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे मतदार संघातील घराणेशाहीने ५० वर्ष जनतेला फसवले. पक्षाने आदेश दिला तर उमेदवारी करू अन्यथा अपक्ष उभे राहण्याचेही माझी तयारी आहे.

तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब सोनवणे, मढीचे सरपंच संजय मरकड, रिपाईचे तालुकाध्यक्ष सतीश मगर, रासप जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर, शब्बीर शेख, बाळासाहेब ठाकरे, संजय टाकळकर, विलास फाटके, रमेश कांबळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल सागडे, नगरसेवक अजय भारस्कर, अंकुश कुसळकर, विकास फलके, दिगंबर काथवते, गणेश गर्गे, भूषण देशमुख, भीमराव फुंदे, उदय मुंडे, सालार शेख, नवनाथ  कोळगे, शितल केदार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.