शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : गणेशोत्सवानिमित वाढलेल्या वाहतूक कोंडीला व अवैध प्रकाराला चाप बसावा म्हणून शेवगाव पोलीस पथकाने राबविलेल्या नाकाबंदीच्या उपक्रमाद्वारे विना नंबर प्लेट, विना लायसन गाडी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट अशा ३३ वाहन चालकावरती केसेस करून २९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शेवतरावच्या बाजारपेठेसह विविध चौकात दिवसभर वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. वाहतूक कोंडी होऊन छोटे मोठे अपघात होतात. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो त्या दृष्टिकोनातून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी दिलेल्या सूचना व आदेशाने शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून विविध चौकांमध्ये नाकाबंदी करून विना नंबर प्लेट, विना लायसन गाडी चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट अशा गाड्याच्या चालकावर कारवाई केली.
शेवगावच्या आठवडे बाजाराची संधी साधून रविवारी केलेल्या कारवाईत एकूण ११ मोटरसायकल बिगर नंबर प्लेट असल्यामुळे पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या पोलीस ठाण्यात आणून मोटरसायकलचे मूळ कागदपत्र तपासून त्यांना नंबर प्लेट बनवणारा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्येच उपलब्ध करून त्या गाड्यांना नंबर प्लेट बसवून दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशाप्रकारची कारवाई ही रोज व वेगवेगळ्या वेळेत अचानक राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नागरे यांनी दिली.
यावेळ उपनिरीक्षक विशाल लहाने, पोलीस हवालदार ससाणे, पोलीस हवालदार परशुराम नाकाडे, पोलीस नाईक संभाजी घाईतडक, पोलीस नाईक आदिनाथ वामन, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, राहुल खेडकर, बप्पासाहेब धाकतोडे, असलम शेख, प्रशांत आंधळे, संदीप उबाळे अदी कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.