शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर जिल्हा विभाग नियंत्रकपदी नुकतेच रुजू होताच राजेंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील पहिले आगार असलेल्या शेवगाव आगारास काल शुक्रवारी (दि.२० ) धावती भेट देऊन शेवगाव आगाराचे कामाची पहाणी करत येथील अडचणी समजून घेतल्या. यावेळी आगाराच्यावतीने आगार प्रमुख अमोल कोतकर व त्यांच्या सहकाऱ्यांर्नी तसेच शेवगावकरांच्या व प्रवासी संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. जगताप यांच्या प्रस्थानानंतर विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे, विभागीय कामगार अधिकारी बाबासाहेब एकशिंगे यांचे उपस्थितीत ” प्रवासी राजा दिन ” साजरा करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. जनार्दन लांडे पाटील, श्याम पुरोहित, रामनाथ रुईकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे व प्रवासी, आगार व्यवस्थापक कोतकर, स्थानक प्रमुख किरण शिंदे. स.वा.नी. राजेंद्र वडते व वरिष्ठ लिपिक आदिनाथ लटपटे यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी झालेल्या चर्चेत बस स्थानकातील सुविधेबाबत व कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केला गेला. नवीन बसेस मिळायला हव्यात अशी मागणी केली गेली. तेव्हा बस स्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार असून पुढील महिन्यात आगारास नवीन बसेस येणार असल्याची सुखद बातमीही देण्यात आली.
शेवगाव बस स्थानकाचे काम प्रगतीपथावर सुरू असून सध्या काँक्रिटीकरण सुरू आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन बसेस देण्यास सुरुवात होईल. आपल्या विभागाला शंभर बसेस मिळतील त्यामधून शेवगाव आगारास दहा बसेस मिळतील. तसेच खासगी नवीन २५ ते ३० बसेस शेवगाव आगाराला मिळणार असून नवीन बसेसमुळे प्रवाशांना सुखकर प्रवासाचा आनंद मिळणार आहे. गणेश दारकुंडेयांनी सर्वांचे आभार मानले.