कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येक खेळाडू हा राष्ट्रीय खेळाडू आहे. या स्पर्धेतून तो परदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. देशाचे प्रतिनिधित्व करता – करता स्वतःच्या जीवनाला एक नवी दिशा देण्याचे काम देखील खेळाडू करत असतो. या क्रिडा प्रकाराच्या माध्यमातून तुम्हाला एक संधी समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आयोजकांनी करून दिली आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धा २०२३ चे उद्घाटक आमदार आशुतोष काळे यांनी केले.
भारतीय जम्प रोप महासंघ, महाराष्ट्र राज्य जम्प रोप असोसिएशन, अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यातील समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय जम्प स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, सिंदखेडराजा येथील लखुजीराजे जाधव यांचे १६ वे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.उद्घाटक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय समता स्कूलचे उपप्राचार्य समीर आत्तार यांनी करून दिला.
ते पुढे म्हणाले की, समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे यांनी एक छोटे रोपटे लावले होते. ते आज खूप मोठे वटवृक्ष झाले असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनाची तयारी उत्कृष्टपणे केली आहे. तसेच शैक्षणिक दृष्ट्याही महाराष्ट्रातील विद्यार्थी केंद्रित स्कूल म्हणून नावाजलेले आहे.
मनोगत व्यक्त करताना शिवाजीराजे जाधव म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणे ही त्या स्पर्धकासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण या स्पर्धेत यश संपादन करून तो पुढील स्पर्धेसाठी तयार होत असतो. तसेच देशाचे नेतृत्व करण्याची एक संधी स्पर्धकाला मिळत असते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे अध्यक्ष संदीप कोयटे म्हणाले की, महाराष्ट्रात जम्प रोपच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेण्याचा मान समता इंटरनॅशनल स्कूल ला मिळाला आणि आज स्पर्धेचे उद्घाटन झाले असून १६ राज्यातील स्पर्धक सहभागी झाले आहे. प्रत्येक स्पर्धकाने आपल्यातील कला दाखवून आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करावे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून तुम्हाला चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
प्रतिमा पूजनानंतर समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतातील विविधतेतील एकतेचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करत प्रमुख पाहुणे, मान्यवर, स्पर्धेसाठी उपस्थित संघांचे स्वागत केले. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश संघाने वेगवेगळ्या प्रकारात जम्प रोपद्वारा प्रात्यक्षिके करून दाखविली. स्पर्धेत महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, आसाम, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आदींसह १६ राज्यातील ४५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.
परीक्षक म्हणून धर्मेश परमार (गुजरात), राजेंद्र प्रसाद (तेलंगणा), आरिफ खान (राजस्थान), मुकुंद झोला (मध्य प्रदेश), उत्पल बोरा (आसाम), गोपेश चांदणी (छत्तीसगड), पवन सिंग व डॉक्टर सीमा पवनगोत्रा (जम्मू काश्मीर) म्हणून काम पाहणार आहे. तसेच भारतीय जम्प रोप महासंघाचे सचिव शाजाद खान, ज्येष्ठ विधीज्ञ जयंत जोशी, छत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे आदींनी मनोगत व्यक्त करत स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे स्वागत करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनपर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री. नानासाहेब बोरस्ते, नायब तहसिलदार श्री.संजय ईसाळकर, भारतीय जम्प रोप महासंघाचे सचिव श्री.शाजाद खान, महाराष्ट्र जम्प रोप असो.चे सचिव श्री. दिपक निकम, जेष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जोशी, नाशिकचे टी.डी.एफ.जिल्हाध्यक्ष श्री.रविंद्र मोरे, शिव छञपती पुरस्कार विजेते श्री.अशोक दुधारे, श्री.दिलीप घोडके, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे अध्यक्ष श्री.संदीप कोयटे, पदाधिकारी, सदस्य, स्पर्धेचे प्रशिक्षक, स्पर्धक मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार उपप्राचार्य श्री समीर अत्तार यांनी मानले.