सुज्ञ मतदार आ. आशुतोष काळेंच्या पाठीशी – मधुकर टेके

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : मतदार संघाच्या प्रश्नांची अचूक जाण आणि ते प्रश्न सोडविण्याची हातोटी असलेल्या आ. आशुतोष काळे यांनी पाच वर्षात कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी अजोड योगदान देतांना मतदार संघाचा विकास तर साधलाच आहे. त्याचबरोबर असे काही प्रश्न कायमचे सोडविले आहेत त्यामुळे मतदार संघातील जनता त्यांच्या कामगिरीवर अतिशय समाधानी आहे. असाच कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील वारी पुलाचा प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी सोडविला आहे. त्यामुळे पूर्व भागातील अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागला असून वारीचा सेतू आ.आशुतोष काळेंच्या विजयाचा मार्ग सुकर करणार असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके यांनी व्यक्त केला.

कोपरगाव मतदार संघातील वारी येथे आ.आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ नागरिकांशी सभापती मधुकर टेके यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील प्रत्येक गावाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील धारणगाव-कुंभारी, चास नळी, कोपरगाव शहरातील बेट भागाला जोडणारा पूल, अहमदनगर-मनमाड महामार्गावरील जुन्या पुलाला समांतर पूल असे गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी मोठे पूल बांधले. त्याप्रमाणे वारी येथे देखील गोदावरी नदीवर पूल बांधण्याचा त्यांचा मनोदय होता.तो मनोदय पूर्ण करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी हा पूल बांधणार असल्याचा शब्द वारी व परिसरातील पंचक्रोशीतील नागरीकांना दिला होता. दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी २० कोटी निधी देवून ह्या पुलाचा प्रश्न त्यांनी कायमचा मार्गी लावला आहे.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सावळीविहीर, रुई, वारी-कान्हेगाव, सडे, शिंगवे आदी गावातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला वारी येथील गोदावरी नदीच्या पुलाचा प्रश्न मागील कित्येक दशकांपासून प्रलंबित होता. पावसाळ्यात गोदावरी नदीचा विसर्ग वाढल्यानंतर पुलावर पाणी येऊन दोनही बाजूंची वाहतूक ठप्प होत असे. त्याचबरोबर जोपर्यंत पुलावरील पाणी ओसरत नाही तोपर्यंत शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीच राहावे लागत होते किंवा दूरच्या मार्गाचा अवलंब करावा लागत असे.

तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून शिर्डी येथे साई पालख्यांसमवेत येणाऱ्या हजारो साईभक्तांची देखील या पुलामुळे गैरसोय होत होती. त्यामुळे हा पूल व्हावा अशी अनेक वर्षापासूनची वारी व पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी होती. त्या मागणीची आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पूर्तता केली आहे. या पुलाचे जवळपास निम्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी हा पुल वाहतुकीसाठी सज्ज होवून आजपर्यंत वारी-कान्हेगाव, सडे, शिंगवे, भोजडे, शिरसगाव, सावळगाव आदी गावातील नागरिकांनी सोसलेला वनवास कायमचा संपणार आहे. त्यामुळे या गावातील सुज्ञ मतदार निश्चितपणे आ. आशुतोष काळेंच्या पाठीशी राहतील व त्यांच्या विजयाचा मार्ग हा वारीचा सेतू सुकर करणार असल्याचे सभापती मधुकर टेके यांनी सांगितले.  

Leave a Reply