कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार (दि. ८) रोजी दुपारी ४.०० वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी दिली आहे.
कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर तसेच कारखान्याचे जेष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीची शिखरे गाठत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. कारखान्याचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात येणार आहे.
७० व्या गळीत हंगामाच्या सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद वर्ग व उद्योग समूहावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतक, कार्यकर्त्यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.