आमदार काळेंच्या गुलाबी गाडीने लक्ष वेधले

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : कोपरगाव विधानसभा मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांनी प्रचाराचा वेग जितका वाढवला आहे तितक्या वेगाने त्यांची गाडी मतदार संघात फिरत आहे, पण आमदार काळे यांच्या गाडीने संपुर्ण मतदार संघाचे लक्ष वेधुन घेतले आहे.

गुलाबी रंगाने नटलेली काळेंची गाडी तरुणाईसह अनेकांना आकर्षीत करणारी ठरली आहे. गुलाबी रंगाने संपुर्ण गाडी सजवली असुन त्यावर उपमुख्यमंञी अजित पवार यांचा गुलाबी जॅकेट घातलेला फोटो अधिक खुलुन दिसत आहे. लाडकी बहीण योजना अंमलात आणली तेव्हा अजित पवार यांनी गुलाबी गाडीची थीम राज्यात प्रसिध्द केली आणि अजित पवार म्हणजे गुलाबी रंग ही नवी ओळख तयार झाली.

याच धर्तीवर आमदार आशुतोष काळेंनी गुलाबी गाडी तयार केली असुन त्यावर  सहकारी राजकीय पक्षाचे झेंडे लावल्याने गुलाबी गाडी अधिकच खुलून दिसत आहे. नागरीक त्या गाडी बरोबर सेल्फी काढत आहेत तर अनेक महीलांचा गुलाबी रंग अधिक आवडीचा असल्याने महीलाही कुतुहलाने गाडीकडे पहातात. 

 या संदर्भात आमदार आशुतोष काळे म्हणाले की, गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. मी मतदार संघात जनतेच्या  हितासाठी अनेक विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेचं माझ्यावर आणि माझं जनतेवर नितांत प्रेम आहे. लाडकी बहीण योजना जशी घरा घरापर्यंत पोहचली त्यातून अजित पवार यांची गुलाबी रंगाची थीम सर्वांपर्यंत पोहचली तसेच ती सर्वांना आवडली. लक्षवेधी गुलाबी थीम आहे. सर्वांचं लक्ष वेधणारी हि गुलाबी पध्दत आहे. जनतेचा आशिर्वाद रुपी प्रेमाची गुलाबी थीम मलाही चांगली वाटते असे म्हणत काळेंनी गुलाबी गाडीचे कौतूक केले.

 दरम्यान आमदार काळेंनी गुलाबी गाडी तयार केल्याने जिल्ह्यातील इतर राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार  काळेंच्या गाडी प्रमाणे आपल्याही गाड्या गुलाबी करण्याची तयारी करीत आहेत. काही तर चक्क काळे यांच्या गाडीचे फोटो मागवून तशी गाडी तयार करण्याच्या सुचेना आपल्या यंञणेला दिल्या आहेत. काळे यांची गाडी जिल्ह्यात लक्ष वेधी ठरत आहे.