हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करा आ. आशुतोष काळेंची मागणी

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. ९ : चालू खरीप हंगामात कोपरगाव मतदार संघात सोयाबीनचे उत्पन्न मुबलक झालेले आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य दर मिळावा यासाठी शासनाकडून हमी भाव जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे केली आहे.

हातात नकदी पैसा देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिलं जातं. अनेक शेतकरी बांधवांचे मुख्य पिक हे सोयाबीन पिक असून सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे कोपरगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीन पिक घेत असतात. शेतकऱ्यांना ज्यावेळी आर्थिक अडचण असेल त्यावेळी शेतकरी सहजपणे सोयाबीन बाजारपेठेत विक्रीसाठी आणून आपल्या आर्थिक अडचणी सोडवू शकतो. त्यामुळे सोयाबीनच्या अर्थकारणावर लाखो शेतकऱ्यांची उपजीविका चालत असते. या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळावा यासाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून २०२४-२५ मध्ये सोयाबीनच्या हमीभावात वाढ करुन तो हमीभाव ४,८९२/- एवढा करण्यात आला आहे.

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत नोंदणी देखील केलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. नुकताच दिवाळी सण पार पडला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या काहीशा आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

तसेच सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांना रब्बीची पिके उभी करण्यासाठी आर्थिक भांडवलाची आवश्यकता आहे. परंतु सोयाबीन खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करण्याची मागणी केली आहे.

तसेच हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु हे पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. हि अडचण दूर करण्यासाठी अधिकृत पोर्टल नियमितपणे सुरु राहील यासाठी काळजी घ्यावी असे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून आ.आशुतोष काळे यांचा प्रचार जोरात सुरु आहे. त्यामुळे साहजिकच धावपळ होत असली तरी शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी ओळखून तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु  करण्याची मागणी केली आहे यावरून त्यांची शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ दिसून येते.